के-ड्रामा पाहिल्यामुळे 30 विद्यार्थ्यांची हत्या
उत्तर कोरियात हुकुमशहाचा क्रूर न्याय
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियात हुकुमशहा किम जोंग उन यांच्या प्रशासनाने 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांना जाहीरपणे गोळ्या घातल्या आहेत. या विद्यार्थ्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी दक्षिण कोरियात निर्मित सीरियल पाहिली होती. या सीरियल्सना कोरियन ड्रामा किंवा के-ड्रामा म्हटले जाते. कोरियन वृत्तपत्र ‘जोंगआंग डेली’नुसार मागील आठवड्यात 30 विद्यार्थ्यांवर सामूहिक स्वरुपात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
या विद्यार्थ्यांनी पेन ड्राइव्हमध्ये स्टोअर करण्यात आलेल्या अनेक दक्षिण कोरियन ड्रामा पाहिले होते. या पेन ड्राइव्ह्सना मागील महिन्यात सोल येथून फुग्यांद्वारे उत्तर कोरियात पाठविण्यात आले होते.
उत्तर कोरियात जपान, कोरियन आणि अमेरिकन ड्रामावर बंदी आहे. तेथे केवळ रशियन चित्रपट किंवा सरकारची मंजुरी प्राप्त मनोरंजनाचे कार्यक्रम दाखविले जातात. उत्तर कोरियात डिसेंबर 2020मध्ये लागू झालेल्या रिअॅक्शनरी आयडियोलॉजी अँड कल्चर रिजेक्शन अॅक्ट अंतर्गत दक्षिण कोरियन माध्यमे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंड तर पाहणाऱ्या लोकांसाठी 15 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
या कायद्यांतर्गत पुस्तके, गीत आणि छायाचित्रांवरही बंदी आहे. यातील एका नियमानुसार दक्षिण कोरियाची भाषा आणि गायनाच्या पद्धतीचा वापर केल्यास दोन वर्षांपर्यंतची सक्तमजुरी करावी लागते. मागील महिन्यात 17 वर्षांच्या सुमारे 30 अल्पवयीनांना जन्मठेप आणि मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. तर जानेवारी महिन्यात दोन अल्पवयीन मुलांकडे कोरियन व्हिडिओ मिळाले होते, ज्यानंतर त्यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
यंदा 22 वर्षीय युवकाकडे 70 हून अधिक कोरियन गाणी आढळून आली होती, ज्यानंतर त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. परंतु शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच तो पळाला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरातच त्याचा मृतदेह आढळून आला होता.