उत्तर कोरियात 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा
पुराचा सामना करण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ सेऊल
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले अधिकारी भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळले. आपत्तीदरम्यान झालेल्या नुकसान आणि मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. किम जोंग यांनी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षेचे आदेश दिले आहेत. मात्र हे अधिकारी कोण आहेत याची माहिती समोर आलेली नाही.
दक्षिण कोरियातील मीडिया टीव्ही चोसुनच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जुलैमध्ये उत्तर कोरियामध्ये भूस्खलन आणि पूर आला होता. या काळात सुमारे 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 4 हजार घरे उद्ध्वस्त झाली होती. पूरग्रस्त भागातील पुनर्बांधणीसाठी 2-3 महिने लागू शकतात, असे हुकूमशहा किम जोंग यांनी म्हटले आहे. त्यांनी देशातील 3 प्रांतांना विशेष आपत्ती आपत्कालीन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
कोरोना महामारीनंतर उत्तर कोरियामध्ये सार्वजनिक मृत्यूदंडाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी, उत्तर कोरियामध्ये एका वर्षात 10 सार्वजनिक मृत्यूदंडाची प्रकरणे होती. मात्र आता दरवषी सुमारे 100 जणांना ही शिक्षा दिली जात आहे. यापूर्वी जुलैमध्ये किम जोंग उन यांच्या हुकूमशाही सरकारने 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांना जाहीरपणे गोळ्या घातल्या होत्या. या विद्यार्थ्यांवर दक्षिण कोरियामध्ये बनवलेल्या मालिका पाहण्याचा आरोप होता. जूनमध्येही 17 वर्षांखालील सुमारे 30 अल्पवयीन मुलांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या वषी जानेवारीमध्ये दोन अल्पवयीन मुलांकडे कोरियन व्हिडिओ सापडले होते, त्यानंतर त्यांना 12 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती.