निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला 30 लाखांचा चुना
सायबर गुन्हेगारांच्या डिजिटल अरेस्टला बळी
बेळगाव : डिजिटल अरेस्टचे प्रकार सुरूच आहेत. प्रत्येक प्रकरणात सावजाला ठकवताना गुन्हेगारांकडून दिली जाणारी कारणे मात्र वेगळी आहेत. एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करून सायबर गुन्हेगारांनी 30 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. वाढत्या डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमुळे दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांना जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. यापाठोपाठ बेळगाव येथील केंद्र सरकारच्या सेवेतील एका निवृत्त अधिकाऱ्याला ठकवल्याची घटना घडली असून यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात एका निवृत्त अधिकाऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या एका गुन्हेगाराने तुमच्या नावाने एक खाते उघडून मनी लँड्रींग केले आहे. त्यामुळे तुमची चौकशी करायची आहे. न्यायालयानेही चौकशीचा आदेश दिला आहे, असे सांगितले. सायबर गुन्हेगारांच्या या फोन कॉलनंतर निवृत्त अधिकाऱ्याला धक्का बसला.
तुमची चौकशी करायची आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून 30 लाख रुपये आम्ही सांगतो त्या खात्यावर जमा करा. चौकशीत तुम्ही दोषी आढळला तर ही रक्कम गोठवण्यात येणार आहे. जर निर्दोष ठरला तर ही रक्कम तुमच्या खात्यावर परत पाठवण्यात येणार आहे, असे सांगितले. निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर 30 लाख रुपये जमा केले. रक्कम जमा होताच चौकशी करण्याचे सांगणाऱ्या गुन्हेगारांनी या निवृत्त अधिकाऱ्याशी संपर्क तोडला. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे त्यांच्या लक्षात आले. लगेच त्याने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधून फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.