For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी हालचाली गतिमान

12:10 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव धारवाड रेल्वेमार्गासाठी हालचाली गतिमान
Advertisement

डिसेंबरपूर्वी भू-संपादन पूर्ण करण्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या सूचना 

Advertisement

बेळगाव : बेळगाव ते हुबळी या वेगवान रेल्वे प्रवासासाठी महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या भू-संपादनाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अशी सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केली आहे. धारवाड व बेळगाव दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीद्वारे सूचना केल्या असून डिसेंबरपर्यंत भू-संपादनासाठी वेळ देण्यात आला आहे. सध्या बेळगावहून हुबळी-धारवाडला रेल्वेने जाण्याकरिता लोंढामार्गे प्रवास करावा लागतो. लोंढा व खानापूरच्या संरक्षित वनविभागातून रेल्वेमार्ग जात असल्यामुळे वेगावर मर्यादा येतात. त्याचबरोबर प्रवासाचा कालावधीही वाढत आहे. त्यामुळे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाला गती मिळाली. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे काम पूर्णपणे ठप्प झाले. या नव्या रेल्वेमार्गामुळे बेळगाव-धारवाड हे अंतर केवळ 90 किलोमीटर होणार असल्याने वेगवान प्रवास करता येणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी रविवारी बळ्ळारी येथे रेल्वे व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत बेळगाव-धारवाड जिल्हाधिकाऱ्यांना भू-संपादनाबाबत सूचना केल्या. प्रकल्प रखडला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे. 2019 मध्ये या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली तर 2020 च्या अर्थसंकल्पात 927 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनेही या रेल्वेमार्गासाठी निधी दिला. परंतु काही शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे भू-संपादनाचे काम रखडले होते. शेतकऱ्यांची समजूत घालून भू-संपादनाची प्रक्रिया राबविण्याची सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. यावेळी नेर्त्रुत्य रेल्वेचे बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी अजय शर्मा, हुबळी येथील विभागीय व्यवस्थापक हर्ष खरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.