चप्पल व्यापाऱ्यांवरील छाप्यात 30 कोटी जप्त
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे प्राप्तिकर विभागाची कारवाई : नोटांचे गठ्ठे पाहून अधिकारी हादरले
वृत्तसंस्था/ आग्रा
उत्तर प्रदेशात आग्रा येथील चप्पल व्यापाऱ्यांच्या घरांवर शनिवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने आग्रा येथील तीन चप्पल व्यावसायिकांवर छापे टाकत तब्बल 30 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. सदर रक्कम मोजताना अधिकारी हैराण झाले आहेत. आग्रा येथे सुभाष बाजार परिसरातील बीके शूज आणि धाकरण चौकात असलेल्या मंशु फुटवेअरवर छापे टाकण्यात आले. पलंगाखाली नोटांचे बंडल लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे. छापेमारीवेळी नोटांचे बंडल पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले होते.
कर चुकवेगिरी करण्यासोबतच बेहिशेबी मालमत्तेची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे पथक शनिवारी सकाळी संशयितांच्या निवासस्थानी आणि आस्थापनांमध्ये पोहोचले होते. त्यानंतर दिवसभर तपासणी व शोधमोहीम सुरू करून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्याशिवाय कागदपत्रे, फाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कित्येक तास सुरू असलेल्या या छाप्यात कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. बीके शूज आणि मंशु फूटवेअरसह आणखी एका चप्पल-शूज व्यापाऱ्याच्या घरावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.