३० कोटी मागितल्याचे सिद्ध केल्यास उमेदवारी मागे घेतो!
संदेश पारकर यांचे प्रतिआव्हान : पराभवाची चाहूल लागल्यानेच खोटेनाटे आरोप!
कणकवली/ प्रतिनिधी
कणकवलीत शहर विकास आघाडीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नीतेश राणे यांना त्यांच्या उमेदवाराच्या पराभवाची चाहूल लागल्याने माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. नीतेश राणे यांनी मी ३० कोटी मागितल्याचे सिद्ध करावे. मी आज, आता कणकवलीतील मंदिरात जाऊन देवासमोरदेखील हे सांगू शकतो. मी ३० कोटी मागितल्याचे सिद्ध केल्यास आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतो, अन्यथा त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे, असे आव्हान शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी व ३० कोटी मागितल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना येथील राजन तेली यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत पारकर बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, उबाठा शिवसेना विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, क्रांतीकारी विचार पक्षाचे एड. पालवे आदी उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, कणकवलीत मतदाराची किंमत ठरवून कोट्यवधीचे वाटप करण्यात आले. मात्र जनता या भ्रष्टटोळीला कंटाळली आहे. आज शहरावासीयांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. येथील स्वाभिमानी जनता विकली जाणार नाही. नीतेश राणे यांनी कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभू मंदिरात किंवा परमपूज्य मालचंद्र महाराज यांच्या मंदिरात जाऊन फूल उचलून, मी ३० कोटी मागितले म्हणून सांगावे. मला विकत घेण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. मात्र विकलो गेलो नाही. संदेश पारकर हा कधीही विकला जाणारा नाही. श्री. पारकर म्हणाले, नीतेश राणे हे भित्रे आमदार आहेत. ते समीर नलावडे व गोट्या सावंत यांना घाबरतात. हे दोघे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील म्हणून राणे त्यांना घाबरतात. नीतेश राणे यांना आमदार मी केले. नीतेश राणे हे मागच्यावेळी कुडाळमधून निवडणूक लढविणार होते. मात्र मी त्यांना कणकवलीतून लढण्यास सांगितले.
कणकवलीतील ठेकेदार अनिल पवार याच्याकडेच सर्व कामे दिली जातात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचीही मागिदारी आहे. याच ठेकेदाराकडून परदेशवारीही केली गेली. कणकवलीत शिंदे शिवसेनेचा अपमान कोणी केला? त्यांनी बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार नीलेश राणे यांचा फोटो काढून टाकला, असा आरोपही श्री. पारकर यांनी केला.