3 हजार वर्षे जुन्या तलवारीचा शोध
स्थिती पाहून थक्क झाले पुरातत्व तज्ञ
जर्मनीत एक प्राचीन तलवार आढळून आली असून ती कांस्य युगाच्या दफनस्थळावरून पुरातत्व तज्ञांनी बाहेर काढली आहे. ही तलवार 3 हजार वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा कालावधी उलटून गेल्यावरही तलवार अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याचे पाहून पुरातत्व तज्ञ चकित झाले आहेत. ही तलवार ख्रिस्तपूर्व 14 व्या शतकाच्या अखेरच्या काळातील तीन जणांच्या थडग्यांमध्ये मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
ही तलवार बवेरियाच्या नोर्डलिंगेन शहरात एका पुरुष, महिला आणि मुलाच्या थडग्यामध्ये मिळाली होती. बवेरियन स्टेट ऑफिस फॉर मॉन्यूमेंट प्रोटेक्शनकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या तिघांनाही एकत्र दफन करण्यात आले होते. त्यांचा परस्परांशी कुठलाही संबंध होता की नाही, हे स्पष्ट नसल्याचे म्हटले गेले आहे.
तलवारीचे पाते अजूनही चमकत असून यात कांस्य धातूद्वारे निर्मित एक अष्टकोनीय मूठ असून जी आता हिरव्या रंगाची आहे, कांस्यमध्ये तांबे समाविष्ट असते. तांबे हा धातू हवा आणि पाण्याच्या संपर्कात आल्यावर ऑक्सिकरण करत असतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या तलवारीचा शोध दुर्लभ आहे, काही काळापूर्वी मध्य कांस्य युगातील अनेक थडग्यांची लुट करण्यात आली होती. केवळ कुशल कारागिरच अष्टकोनीय तलवारींची निर्मिती करू शकत होते. तलवारीच्या पात्यावर कुठलीही खूण नसल्याने तिची निर्मिती केवळ औपचारिक किंवा प्रतिकात्मक स्वरुपाची होती, असे पुरातत्व तज्ञांनी म्हटले आहे.