कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

12:21 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लष्कर ए तोयबाची हानी : पाकिस्तानला पुन्हा दणका

Advertisement

वृत्तसंस्था / .श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे एका चकमकीत सुरक्षा सैनिकांनी किमान 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्यापैकी 2 लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय सेना आणि अर्धसैनिकी दले यांच्या संयुक्त अभियानात हे दहशतवादी ठार झाले.

ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक शाहीद कुट्टी नामक दहशतवादी 2024 मध्ये डेन्मार्कमधील एका रिझॉर्टवरील हल्ल्यात समाविष्ट होता. त्या हल्ल्यात दोन जर्मन पर्यटक आणि एक वाहनचालक यांचा बळी गेला होता. या दहशतवाद्याने हीरपोर येथील भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाची हत्या 18 मे 2024 या दिवशी केली होती. त्याच्यावर काही बिगर काश्मीरींची हत्या केल्याचाही आरोप आहे.

सिंदूर अभियानानंतरचे यश

नुकतेच भारताने पाकिस्तानविरोधात सिंदूर अभियान यशस्वी केले आहे. त्यानंतर भारताला हे दुसरे यश त्वरित मिळाले आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारण्याचे क्रौर्य दहशतवाद्यांनी दाखविले होते.

अशी झाली कार्यवाही

सिंदूर अभियानात दणका खाल्लेल्या पाकिस्तानने आता पुन्हा भारतात दहशतवादी घुसविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानचे सैनिक आणि रेंजर्स प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भारताने सीमेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दहशतवाद्यांचा एक गट भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने पुरविल्यानंतर भारतीय सेना आणि अर्धसैनिकी दलांचे सैनिक यांनी शोपियानच्या वनविभागाला वेढा घालून या दहशतवाद्यांच्या गटाची कोंडी केली. त्यामुळे या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. त्याला सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात किमान 3 दहशतवादी मारले गेले.

एका पाकिस्तान्याचा समावेश

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश होता, अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचे नाव अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. तथापि, तो पाकिस्तानी असल्याची ओळख पटली आहे. त्याच्या नावावरही काही हत्या आहेत. आणखी काही दहशतवादी वनप्रदेशात लपून बसले असल्याची शक्यता असल्याने सैनिकांकडून पुढची कार्यवाही केली जात आहे.

मोठा शस्त्रसाठा हस्तगत

या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडचा मोठा शस्त्रसाठा सेनेने हस्तगत केला आहे. या शस्त्रांमध्ये चार एके 47 रायफल्स, हातबाँब, पिस्तुले आणि इतर साधनसामग्री आहे. काही संपर्कसाधनेही हस्तगत करण्यात आली आहेत. रोख रक्कम आणि प्रक्षोभक पोस्टर्स ताब्यात घेण्यात आली आहेत. भारतात मोठा उत्पात घडविण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता, हे या शस्त्रसाठ्यावरुन दिसून येत आहे. अलिकडच्या काळात जप्त झालेला हा सर्वात मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती देण्यात आली.

वितळणाऱ्या बर्फाचा गैरफायदा

सध्या उन्हाळ्यामुळे काश्मीरच्या डोंगराळ भागातील हिम वितळत आहे. त्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील हिमाच्छादित मार्ग मोकळे होत आहेत. याचा दुरुपयोग करुन दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना पाकिस्तानच्या सेनेचे सक्रिय साहाय्य मिळत आहे, असे दिसून येत असून त्यामुळे सीमाभागातील महत्त्वाच्या स्थानी गस्त वाढविण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली आहे. सिंदूर अभियान यशस्वीरित्या पार पाडल्याने भारताच्या सैनिकांचे मनोधैर्य आता उंचावलेले असून दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article