छत्तीसगडमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा
दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांसोबत चकमक
वृत्तसंस्था/ दंतेवाडा
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये 25 लाख रुपयांचे इनाम असलेला सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली देखील सामील आहे. चकमकीच्या स्थळावरुन इंसास रायफलसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. तर सुरक्षादलांकडून संबंधित परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील गिरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली या भागात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि बस्तर फायटर्सच्या टीमने नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती. सुरक्षा दलांना पाहता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी मारले गेले. यातील एका नक्षलवाद्याची ओळख पटली असून उर्वरित दोन नक्षलवाद्याची ओळख पटविली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली आहे.
मागील 83 दिवसांमध्ये 100 हून अधिक नक्षलवाद्यांना चकमकीत जीव गमवावा लागला आहे. मागील आठवड्यात छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी मोठा प्रहार करत दोन चकमकींमध्ये 22 नक्षलवाद्यांना ठार करण्यास यश मिळविले हेते.