युक्रेन युद्धात रशियाच्या 3 लाख सैनिकांचा मृत्यू
कैद्यांना मिळतोय सैन्यात प्रवेश : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खुलासा
वृत्तसंस्था/ कीव्ह
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनुसार युक्रेन युद्धात आतापर्यंत 3 लाख 15 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या या युद्धापूर्वी रशियाच्या सैन्यात 3 लाख 60 हजार सैनिक होते. युद्धात 87 टक्के रशियन सैनिक मारले गेले आहेत. युद्धाने रशियाच्या सैन्याला आधुनिक स्वरुप देण्याच्या ब्लादिमीर पुतीन यांच्या योजनेला 15 वर्षांनी मागे लोटले आहे. या हानीतून सावरण्यासाठी रशिया स्वत:च्या सैन्यात आता कैद्यांची भरती करत असून त्यांना युद्धमैदानावर देखील पाठवत आहे.
12 डिसेंबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे अमेरिकेत पोहोचले. याचदरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने युद्धाशी निगडित एक अहवाल संसदेत सादर केला आहे. विरोधी पक्ष रिपब्लिकन पार्टीने अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात आलेल्या अतिरिक्त सहाय्यावर आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेने हा अहवाल कॅपिटल हिल (अमेरिकन संसद भवन) मध्ये सादर केला आहे. बिडेन प्रशासन युक्रेनला अतिरिक्त निधी पुरवू पाहत आहे.
युक्रेनियन मोबाइल नेटवर्कवर सायबर अटॅक
याचदरम्यान मंगळवारी रात्री युक्रेनमधील सर्वात मोठ्या मोबाइल नेटवर्कवर सायबर अटॅक झाल्याने इंटरनेट आणि कम्युनिकेशन ठप्प झाले. कीव्हस्टार नेटवार्क 2 कोटीहून अधिक लोकांना इंटरनेटची सेवा पुरविते. सायबर हल्ल्यानंतर कोट्यावधी लोकांना इंटरनेटपासून वंचित रहावे लागले आहे. या सायबर हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेनने व्यक्त केला आहे.
शरणागती पत्करण्यास नकार
अनेक देश युक्रेनने शरणागती पत्करून रशियाचा कब्जा मान्य करावा असा सल्ला देत आहेत. परंतु अशाप्रकारचा सल्ला देणारे लोक मूर्ख आहेत. युक्रेनने पराभव का मान्य करावा. आम्ही आमची भूमी दहशतवाद्यांना सोपविणार नाही असे उद्गार व्हाइट हाउसमध्ये पोहोचलेल्या झेलेंस्की यांनी काढले आहेत.