‘करावे तसे भरावे’ : ट्रूडोंना आला अनुभव
वृत्तसंस्था / ओटावा
ज्या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारताशी पंगा घेतला, त्यांना सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी खलिस्तानवाद्यांनीच पुढाकार घेतला आहे. खलिस्ताची समर्थक असणाऱ्या न्यू डेमॉव्रेटिक पक्षाने ट्रूडो सरकारला असलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या पक्षाच्या वतीने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावही मांडला जाणार आहे. परिणामी त्यांचे सरकार आता धोक्यात आले आहे, अशी चर्चा आहे.
ट्रूडो यांच्या पक्षाच्या कॅनडाच्या संसदेत 153 जागा आहेत. या पक्षाला बहुमतासाठी आणखी 17 जागांची आवश्यकता आहे. आतापर्यंत या पक्षाला न्यू डेमॉक्रेटिक पक्षाच्या 25 सदस्यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे या सरकारकडे काठावरचे बहुमत होते. तथापि, आता हा पाठिंबा काढून घेतला गेल्याने गेल्या चार महिन्यांपासून हे सरकार अल्पमतात आहे. आता त्याला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यास ट्रुडो सरकारचे पतन निश्चित आहे. येत्या आठवड्यात चित्र स्पष्ट होणार आहे.