For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधणार

06:50 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधणार
Advertisement

मोदी 3.0’चा पहिला मोठा निर्णय : शेतकऱ्यांनाही लवकरच ‘पीएम किसान’चा हप्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ‘मोदी 3.0’च्या या पहिल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. देशवासियांसाठी सर्वात मोठा निर्णय घेताना आगामी पाच वर्षात ग्रामीण भाग आणि शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या घरांमध्ये शौचालय, एलपीजी कनेक्शन, वीज आणि नळ कनेक्शनही उपलब्ध करून दिले जाईल.

Advertisement

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी पातळीवर 3 कोटी घरे बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षांत गरिबांसाठी 4.21 कोटी घरे बांधली आहेत. 2015-16 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी स्तरावर गरजूंना घरे दिली जातात. या घरांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांतर्गत घरगुती शौचालय, एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन, नळ कनेक्शन यासारख्या इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत गरजू कुटुंबांची संख्या वाढल्याने आणखी घरे बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ही गरज पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

आरटीपीसीआर चाचणीची अट रद्द

नवीन सरकारच्या स्थापनेनंतर सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरटीपीसीआर चाचणीची अटही रद्द करण्यात आली. कोरोनानंतर मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. आता कोरोना विषाणूंचा धोका कमी झाल्यामुळे या चाचणीपासून सर्वांची सुटका करण्यात आली आहे.

‘पीएम किसान’ निधीच्या फाईलवर स्वाक्षरी

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 17 वा हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते जारी करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आता 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा असताना तिसऱ्यांदा मोदी सरकार विराजमान होताच पंतप्रधानांनी 17 वा हप्ता जारी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. म्हणजे लवकरच या योजनेशी संबंधित कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळू शकणार आहे. सध्या नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी जून महिन्यातच सदर 2,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेचच अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून त्यांनी पदभार स्वीकारत पहिला आदेश जारी केला. त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकऱ्यांना खूश करणार आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी दिली. याचा फायदा 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून सुमारे 20,000 कोटी ऊपये वितरित केले जातील.

किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीनवेळा 2,000 ऊपयांचा हप्ता दिला जातो. केंद्र सरकारने निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. आता किसान सन्मान निधीच्या फाईलवर सर्वप्रथम स्वाक्षरी करून पंतप्रधानांनी आपल्या सरकारला सर्वप्रथम शेतकऱ्यांची काळजी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारताच पहिली फाईल शेतकरी हिताशी संबंधित असणे योग्य आहे. आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे’, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Advertisement

.