ताजिकिस्तानमध्ये हल्ल्यात 3 चिनी नागरिक ठार
अफगाणिस्तानवर हल्ल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ दुशान्बे
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या ताजिकिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांवर प्राणघातक ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तीन चिनी नागरिक ठार झाले. दुशान्बे येथील चिनी दूतावासाने शुक्रवारी ही माहिती दिली. हा हल्ला ग्रेनेड आणि स्फोटकांनी भरलेल्या यूएव्हीने केल्याचे ताजिकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. तसेच हा हल्ला सीमेपलीकडून म्हणजेच अफगाणिस्तानातून झाला. याद्वारे ताजिकिस्तानच्या नैऋत्य खातलोन प्रदेशातील कॅम्प हाऊसिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दूतावासाने अद्याप या हल्ल्यामागे कोण आहे हे उघड केलेले नसले तरी, चीनने ताजिकिस्तानकडे चौकशीची विनंती केली आहे. या हल्ल्यात आणखी एक चिनी नागरिक जखमी झाल्याचे चिनी दूतावासाने सांगितले. त्याचवेळी, त्यांनी आपल्या नागरिकांना सीमावर्ती परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले.