दिल्लीत लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडले 3.79 कोटींचे घबाड
सीबीआयने ‘डीयुएसआयबी’ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड (डीयुएसआयबी) कायदा अधिकारी विजय मॅग्गू याला 5 लाख रुपयांची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडले आहे. यानंतर तपास पुढे नेत असताना सीबीआयने विजय मॅग्गू याच्या घरावर छापा टाकत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची बंडल्स हस्तगत केली. सीबीआयने त्याच्या घरातून 3.79 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. विजय मॅग्गू याच्याव्यतिरिक्त सीबीआयने आणखी दोन जणांना लाचप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
एका व्यक्तीने 4 नोव्हेंबर रोजी मॅग्गूविरुद्ध लाचप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध सीबीआयने सापळा रचत कारवाई केली. विजय मॅग्गू याने 5 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने 7 नोव्हेंबर रोजी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी विधी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 40 लाख रुपयांची लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या लाचेच्या बदल्यात अधिकाऱ्याने त्यांची दोन दुकाने डी-सील करत कोणत्याही त्रासाशिवाय पुन्हा त्यांना चालवू देण्याचे आश्वासन दिले होते. तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. 7 नोव्हेंबर रोजी विजय मॅग्गूला 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. यानंतर सीबीआयने विजय मॅग्गूच्या निवासी जागेवरही छापा टाकला. या छाप्यात त्याच्याकडून 3.79 कोटी रुपयांची रोकड आणि काही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.