तीन चोरट्यांसह 3.20 लाखांचे सोने जप्त
वार्ताहर /विजापूर
शहरातील सॅटलाईट बसस्थानक आवारात संशयास्पद फिरत असणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 3.20 लाख रुपये किमतीचा 4 तोळ्याचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिवबसव लोंडे (वय 40), स्वप्ना जाधव (वय 30) व प्रेरणा चौगले (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर कारवाईविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरातील सॅटलाईट बसस्थानकावर शिवबसव लोंढे, स्वप्ना जाधव व प्रेरणा चौगले हे संशयास्पदरित्या फिरत होते. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सोन्याचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 4 तोळ्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बसमध्ये गडबडीत चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ऐवज चोरला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी जिल्हा अतिरिक्त अधीक्षक शंकर मारिहाळ, रामगौडा हत्ती, डीवायएसपी बसवराज एलिगार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. सदर कारवाईसाठी गांधी चौक पोलिसांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नियुक्त केले होते. सीपीआय महांतेश दामन्नवर यांच्या तपास पथकाला आरोपींना अटक करण्यात यश मिळाले. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.