29 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन काणकोणात
दि. 13, 14 रोजी भरगच्च साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम : महत्त्वपूर्ण विषयांवर परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन
पणजी : यंदाचे 29 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन काणकोण येथे आयोजित करण्यात आले असून आमोणे काणकोण येथील प्रा. स. शं. देसाई साहित्यनगरीत येत्या दि. 13 रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवसांच्या या संमेलनादरम्यान भरगच्च साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सभापती रमेश तवडकर यांनी या संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रमेश वंसकर, राजमोहन शेट्यो, किसन फडते, सुहास बेळेकर, महादजी प्रभुदेसाई आदींची उपस्थिती होती. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, श्रीबलराम शिक्षण संस्था आणि राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक सोनाली नवांगूळ, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, स्वागताध्यक्ष रमेश तवडकर, सरपंच सविता तवडकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान स्मरणिका प्रकाशन, सुवर्ण पदक प्रदान, मान्यवरांचा गौरव आणि सुमारे 12 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी दोन परिसंवाद
उद्घाटन सत्रानंतर 11.30 वाजता ‘गोमंतकीय कथात्मक मराठी साहित्यातील ग्रामीण चित्रण’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. प्रमदा देसाई, विनय बापट, सारिका अडविलकर, शुभलक्ष्मी गांवकर, तृप्ती फळदेसाई यांचा सहभाग असेल. दुपारी 2 वाजता ‘इंग्रजी आक्रमणापुढे प्रादेशिक भाषांचे भवितव्य’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात स्नेहा म्हांबरे, विनय मडगावकर, मिलिंद माटे, शांताजी गावकर, मयुरेश वाटवे यांचा सहभाग असेल.
कविसंमेलन, ‘विष्णुमय जग’
दुपारी 3.15 वाजता गणेश बाक्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिथयश कवींचे संमेलन होईल. सायं. 5.15 वाजता स्व. विष्णू वाघ यांच्या कवितांवर आधारित ‘विष्णुमय जग’ हा कार्यक्रम बाळकृष्ण मराठे सादर करतील. सायं. 6.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
बालसहित्यावर परिसंवाद
दुसऱ्या दिवशी दि. 14 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘बालवाङमयाची उपेक्षा होत आहे का’ या विषयावर परिसंवाद होईल. राजू भिकारो नाईक यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादात शितल साळगावकर, रजनी रायकर, पुष्पा गायतोंडे, शर्मिला प्रभू यांचा सहभाग असेल.
गिरीश प्रभुणेंची मुलाखत
सकाळी 10.30 वा. साहित्यिक विचारवंत गिरीश प्रभुणे यांची परेश प्रभू प्रकट मुलाखत घेतील. दु. 12.15 वाजता ‘आम्ही सावित्रीबाई-बहिणाबाईच्या लेकी’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात अनिता तिळवे, पौर्णिमा केरकर, कालिका बापट, दिप्ती फळदेसाई, प्राची जोशी यांचा सहभाग असेल. दुपारी 2.30 वा. कविता बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचे कविसंमेलन होईल. दु. 4.30 वा. समारोप सोहळा होईल. त्यावेळी खासदार सदानंद तानावडे, सभापती रमेश तवडकर, सोमनाथ कोमरपंत, आदी मान्यवर उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होईल.
साहित्य सुवर्ण पदकासाठी विठ्ठल गावस यांची निवड
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आयोजित अखिल गोमंतक साहित्य संमेलनात ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिकाला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्याची प्रथा आहे. यावर्षी काणकोण येथे होणाऱ्या 29व्या साहित्य संमेलनात गोमंतकीय कथा-कादंबरीकार विठ्ठल गावस यांची त्रिसदस्य समितीने निवड केली आहे. हे सुवर्ण पदक म्हापसा येथील उद्योजक व साहित्यिक गुऊदास नाटेकर यांनी प्रायोजित केले आहे. विठ्ठल गावस यांचे चार कथासंग्रह व खाणमाती ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. गोमंतक साहित्य मंडळाने प्रकाशित केलेल्या क्षितिजरंग या प्रातिनिधिक कथासंग्रहाचे संपादनही त्यांनी केले आहे. त्यांना या वर्षाचा गोवा सरकारचा साहित्यासाठी असलेला राज्य पुरकार प्राप्त झालेला आहे. गोवा कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, खाणमातीसाठी गोवा मराठी अकादमीचा सुभाष भेंडे पुरस्कार, धी गोवा हिंदु असोसिएशन, मुंबई चा बा. भ. पुरस्कार, फुदसांव ओरीयेंतेचा आल्बान कुतो पुरस्कार असे विविध संस्थांचे साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांची काही पुस्तके गोवा विद्यापीठाच्या व महाराष्ट्रातल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत. त्यांच्या कथांचे इंग्रजी अनुवाद छापलेले आहेत.