गाझामध्ये चुकून मारले गेले 29 सैनिक
काहींवर सहकाऱ्यांनीच गोळ्या झाडल्या : आयडीएफने दिली माहिती
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
नव्या वर्षात देखील इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू आहे. याचदरम्यान इस्रायली डिफेन्स फोर्सेसकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयडीएफनुसार गाझामध्ये युद्धादरम्यान आतापर्यंत 172 इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. यातील 29 सैनिकांचा मृत्यू हा फ्रेंडली फायर किंवा चुकून झालेल्या गोळीबारामुळे झाला आहे. सैनिक सतर्क राहिले असते आणि नियमांचे पालन करण्यात आले असते तर या घटना रोखता आल्या असत्या.
18 जणांचा मृत्यू फ्रेंडली फायरमध्ये
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाले होते, परंतु आयडीएफने ग्राउंड ऑपरेशन ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू केले होते. यानंतर आतापर्यंत एकूण 172 इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. यातील 29 सैनिकांचा मृत्यू दोन कारणांमुळे झाला आहे. पहिले कारण प्रेंडली फायर असून यात एखादा सैनिक स्वत:च्या सहकारी सैनिकावर चुकून किंवा ओळख न पटल्याने गोळी झाडत असतो. दुसरे कारण दुर्घटना असून यामुळे देखील अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला आहे.
ओळख न पटल्याने गोळीबार
फ्रेंडली फायर किंवा दुर्घटनांमध्ये किती सैनिक जखमी झाले आहेत हे आयडीएफने स्पष्ट केलेले नाही. 18 सैनिक तर केवळ फ्रेंडली फायरमध्ये मारले गेले आहेत. यातही बहुतांश जणांचा मृत्यू ओळख न पटल्याने झाला आहे आणि याचे कारण अधिक अंतर असणे देखील आहे. काही सैनिक हवाई हल्ल्यांमध्ये देखील मारले गेले आहेत.
अन्य कारणांमुळेही जीवितहानी
9 सैनिकांचा मृत्यू दुर्घटनांमध्ये झाला आहे. काही सैनिकांना तर इस्रायली सैन्याच्या चिलखती वाहनांनीच चुकून चिरडले आहे. तर काही जण इमारत जमीनदोस्त करण्यादरम्यान स्फोटकांच्या तावडीत सापडले आहेत. गाझामध्ये अनेक सैनिक एकाचवेळी कार्यरत आहेत. यातील काही जणांनी युद्धक्षेत्रातील प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केलेले नाही आणि यामुळे सैन्याला नुकसान सहन करावे लागल्याचे आयडीएफचे सांगणे आहे.
हिजबुल्लाहला शिकविणार धडा
आता दक्षिण लेबनॉनवर कब्जा करण्याची गरज आहे. लेबनॉनमुळे आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. याचमुळे या नुकसानीची भरपाई त्याच्याकडून केली जावी. किमान 50 वर्षांसाठी लेबनॉनवर कब्जा केला जावा. यामुळे हिजबुल्लाहचे अस्तित्व संपेल आणि शांतता प्रस्थापित होईल असे इस्रायलचे विरोधी पक्षनेते आणि माजी संरक्षणमंत्री एविगडोर लिबरमॅन यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे.