For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा; कांकेरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई

06:58 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा  कांकेरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई
Advertisement

 : मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री

Advertisement

वृत्तसंस्था/ कांकेर

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथील माड भागात सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात अद्याप चकमक सुरू असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. नक्षलींसोबतच्या चकमकीत बीएसएफचे निरीक्षक रमेश चौधरी यांच्यासमवेत 3 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून 5 एके-47 रायफल्स हस्तगत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

कांकेरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात छोटे बेठिया भागात चकमक झाली आहे. चकमकीच्या स्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्यात आले आहे.

नक्षलींचा कमांडर ठार

या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकर राव देखील मारला गेला आहे. चकमकीच्या ठिकाणावरून आतापर्यंत 29 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या संख्येत आधुनिक रायफल, 7 एके-47, 3 एलएमजी हस्तगत करण्यात आले. चकमकीत मारला गेलेल्या शंकर राववर 25 लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. तसेच चकमकीत ठार झालेल्या आणखी एका नक्षलवाद्याच्या विरोधात 25 लाख रुपयांचे इनाम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते.

नक्षलवाद्यांकडून हल्ला

छोटे बेठिया क्षेत्रात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) एका संयुक्त पथकाला नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. हे दल गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता, यात दोन जवान जखमी झाले होते. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर दिले असता अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई सुरूच असल्याचे समजते.

10 दिवसांपूर्वी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कोरचोली आणि लेंड्रा येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले होते. तसेच अनेक नक्षलवादी या चकमकीत जखमी झाले होते. मागील काही काळापासून छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेला वेग आला आहे.

उच्चस्तरीय बैठकीची पार्श्वभूमी

6 दिवसांपूर्वीच दोन दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर आलेले गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि आयबी संचालक तपन कुमार डेका यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत 10 राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक ऑनलाईन स्वरुपात सहभागी झाले होते. तसेच बैठकीत लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडणे आणि नक्षलग्रस्त भागांमधील रणनीतिवरून चर्चा करण्यात आली होती. तर इंटेलिजेन्स ब्युरोच्या इनपूटच्या आधारावर नक्षलवाद विरोधातील अनेक मोहिमांची रणनीति तयार करण्यात आली. कांकेरमधील चकमक याचाच परिणाम असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.