For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्र स्पष्ट, तोफांचा धडाका

06:30 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्र स्पष्ट  तोफांचा धडाका
Advertisement

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सुमारे आठ हजार जणांनी अर्ज भरले होते, त्यातील अनेकांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली व आता रिंगणात चार हजार एकशे चाळीस उमेदवार उरले आहेत. प्रमुख लढत तीन पक्षांची सत्तारुढ महायुती विरोधी तीन पक्षांची महाआघाडी अशी असली तरी अनेक मतदारसंघात गंमतीजमती झाल्या आहेत. बंडखोर तर आहेतच पण काही अधिकृत उमेदवारांनी माघार घेऊन पेच निर्माण केला आहे. मनसे, तिसरी आघाडी, महापरिवर्तन शक्ती व छोटे छोटे पक्ष यांनीही काही मतदारसंघात चुरस वाढवली आहे. रणनीती म्हणून उमेदवारांच्या नावाशी व चिन्हाशी जवळीक असणारे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. इस्लामपूरात जयंत पाटील नावाचे तिघे उभे होते. आता मैदान पक्के झाले आहे व तोफमारा करायला स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, प्रणिती शिंदे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी सभा व मेळाव्यांचा धडाका लावला आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप चाणक्य अमित शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पाडापाडीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी आशा लावलेले काही उमेदवार रिंगणात उरले आहेत त्याचे काय होते हे बघायचे पण महायुती व महाआघाडी दोन्ही छावण्यात बंडखोरी, जागावाटप घोळ आणि अधिकृत उमेदवारांची अखेरच्या क्षणी माघार यामुळे नियोजन कोलमडले आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष यांचाही जोर आहे. या बंडोबा आणि छोटे छोटे पक्ष यांची आमदार संख्या पन्नासभर झाली तर सत्तेत नवा ट्विस्ट येणार हे उघड आहे. अशा वेळी राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, अजितदादा पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी नेते मंडळी जुळवाजुळव आणि संख्याबळ यासाठी सरसावणार हे उघड आहे. त्यामुळे निवडणुकीत निकाल काय लागतो हे महत्त्वाचे आणि निवडणुकीनंतर सत्तास्थापनेत कोण यश मिळवते, याला महत्त्व येणार आहे. एकुण चित्र पाहता लोकसभा निवडणुकीनंतर अनेक बदल झाले आहेत. आणि या वेळच्या निवडणुका अभूतपूर्व आहेत. महाआघाडीची लोकसभा निवडणुकीत सरशी झाली. त्यानंतर महाआघाडी नेत्यांना आता महाराष्ट्र जिंकलाच असे जणू वाटू लागले आहे. मोठा भाऊ, चेहरा, जागावाटप यात फारच घोळ घातले गेले. नाना पटोले विरोधी संजय राऊत असा सामना रंगला. तुटेल इतके ताणले गेले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी नाराज झाले पण घोळ काही मिटेना. दरम्यान जागा वाटपावरून इतका घोळ घालून जाहीर उमेदवार यादीत आणि घोषणेत घोळ झालेच. कोल्हापूर, पंढरपूर, अमरावती, सांगलीसह अनेक ठिकाणी बंड झाले आहे. कोल्हापूरात कॉंग्रेसचे हात चिन्ह गायब झाले आहे. समीर भुजबळ, हिना गावीत, गिता जैन, गायत्री शिंदे, ज्योती मेटे, जयश्री पाटील, तौफिक शेख, नरेंद्र जीचकार अशी अनेक मंडळी बंडाचा झेंडा घेऊन उभी आहेत. सदा सरवणकर यांना राज ठाकरे भेटले नाहीत म्हणून तेथे तिरंगी सामना होतो आहे. सर्वच पक्ष आघाड्या आणि युती यामध्ये बंडाची रणवाद्ये वाजत असली तरी मतदार कुणाला आपलेसे करतात हे महत्त्वाचे आहे. जसे नेते, रणनीतीकार तरबेज आहेत, त्याप्रमाणे मतदार हुषार झाला आहे. आपण निवडून दिलेला आमदार त्याच पक्षात, त्याच विचाराला पाच वर्षे सोबत करेल याची शाश्वती कोणालाच उरलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाने काही नवे चेहरे दिले. बाकी इकडून तिकडून ‘तेच ते’ चेहरे यंदाच्या निवडणुकीत आहेत. शरद पवारांचे उमेदवार म्हणजे तीच ती घराणी आहेत. तीव्र चुरस, सर्व मार्गांचा अवलंब आणि सर्व आयुधं या निवडणुकीत न भुतो वापरली जात आहेत. वाहन तपासणीत सापडलेली रक्कम व दागिने थक्क करणारे आहेत. फराळ व पाकीट वाटले, साड्या वाटल्या हे तर आहेच तर त्यांनी बहिणीना 1500 रुपये दिले. आम्ही 3000 देऊ अशा घोषणा महाराष्ट्रात रेवडी संकृती रूजवत आहेत. आता नेत्यांच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांनी टोलेजंग सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. राहुल गांधी लोकसभेचीच टेप वाजवत आहेत. घटनेची लालप्रत हातात घेऊन घटना बचावचा नारा आणि जातीय जनगणना यावर त्यांचा प्रचार भर आहे. दिल्लीतील सत्ता मिळाली तर आरक्षण मर्यादा वाढवू असे ते म्हणत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी खोटा प्रचार करत लाल शहरी नक्षलवाद पसरवत आहेत, असा हल्ला केला आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करुन युती, आघाडीवर जोरदार प्रहार करत एकदा सत्ता देऊन बघा तक्रार संधी देणार नाही अशी हाक दिली आहे. भाजपाचा प्रचार लाडकी बहिण, विकास कामे व डबल इंजिन यावर आहे. अमित शहा आता प्रचार मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरी 50 सभा घेणार आहेत. शरद पवार यांनी 50 सभांचे आयोजन केले आहे. जयंत पाटील, प्रणिती शिंदे, रुपाली चाकणकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी सभांचा दणका लावला आहे. सोशल मीडिया व अन्य प्रचार यांना गती आली आहे. महायुतीच्या आमदारांचे सध्या 200 इतके संख्याबळ आहे. सहज पुन्हा बहुमत मिळवू असे त्यांना वाटते आहे पण निवडणुकीत काहीही होऊ शकते. सर्व शक्यता गृहीत धराव्या लागतात. मतमोजणी नंतर काय होणार, कोण कोणाबरोबर राहणार हे कुणालाच खात्रीने सांगता येत नाही. तूर्त लढतीचे बहुरंगी चित्र स्पष्ट झाले आहे. नेते प्रचार मैदानात उतरले आहेत. मतदार काय कौल देतात, कुणाच्या हाती हुकमाची पाने येतात आणि कोण सत्ता मिळवते, हे बघावेच लागेल. महाराष्ट्रात यापूर्वी विधानसभेची अशी बहुआयामी निवडणूक झाली नाही, होणार नाही. त्यामुळे औत्सुक्य अधिक वाढले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.