पहिल्या दिवशी 28 भटक्या कुत्र्यांना टोचली अँटीरेबीज लस
महापालिका-पशुसंगोपन खात्याचा पुढाकार : मोहीम महिनाभर विविध ठिकाणी राबणार
बेळगाव : जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका आणि पशुसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना अँटी रेबीजा लस टोचली जात आहे. सोमवारी मोहिमेच्या पहिल्यादिवशी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील 28 भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना लस टोचण्यात आली. ही मोहीम महिनाभर विविध ठिकाणी चालणार आहे. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून पशुसंगोपन खात्याकडून पाळीव कुत्र्यांना मोफत अॅँटी रेबीज लस टोचली जात होती. मात्र यंदा पहिल्यांदाच महानगरपालिका आणि पशुसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस टोचली जात आहे. कारण शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याचबरोबर कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
रेबीजची लागण झाल्यास मृत्यू अटळ
पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्यास संबंधित रुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार होणे गरजेचे आहे. रेबीजवर अद्यापही उपचार नसल्याने एकदा रेबीजची लागण झाल्यास रुग्णांचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. पाळीव असो वा भटकी असो त्यांना अँटी रेबीज लस दरवर्षी टोचून घेणे गरजेचे आहे. यंदा चालू वर्षाच्या सहा महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कुत्र्यांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यास महानगरपालिकेला अपयश आल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोंधळी गल्ली परिसरात आज मोहीम राबविणार
पहिल्या दिवशी मध्यवर्ती बस स्थानक आवारात मोहीम राबविली. मनपाच्या सात कर्मचाऱ्यांनी जाळीच्या साहाय्याने एकूण 28 कुत्री पकडली त्या सर्व कुत्र्यांना पशु संगोपन खात्याचे डॉक्टर चंद्रू यांच्या नेतृत्वाखालील चार जणांच्या पथकाकडून कुत्र्यांना लस टोचली. पहिल्या दिवशी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारी गोंधळी गल्ली आणि परिसरात सदर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.