मांडवी, जुवारीच्या स्वच्छतेवर आतापर्यंत 28 कोटी खर्च
प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकारच्या ‘नमामी गंगे’ उपक्रमांतर्गत गोव्यातील मांडवी आणि जुवारी या दोन नद्यांची निवड करण्यात आली असून त्यासाठी तब्बल 95 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत त्यातील केवळ 28 कोटी ऊपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती जलशक्ती मंत्रालयातर्फे राज्यसभेत देण्यात आली आहे.
देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमामी गंगे’ हा उपक्रम सुरु केला आहे. त्या अंतर्गत 2019-20 ते 2024-25 या आर्थिक वर्षात 10,775 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात नदी संवर्धन आराखड्याखाली 1,244 कोटी मंजूर केले आहेत.
या उपक्रमात गोव्यातील दोन नद्यांचा समावेश आहे. मांडवी आणि जुवारी या त्या दोन नद्या असून त्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्राकडून 95 कोटी मंजूर झाले आहेत, अशी माहिती जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली आहे. नमामी गंगे उपक्रमात राष्ट्रीय जल दर्जा उपक्रमाच्या देखरेख स्टेशनामार्फत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांमधील पाण्याच्या दर्जावर लक्ष ठेवत असतात.
गोवा सरकारने मांडवी आणि जुवारी या नद्यांमधील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी रु . 28.93 कोटी खर्च केले आहेत. त्यातून या नद्यांच्या तिरावर 12.50 एमएलडी क्षमतेचे सिव्हरेज प्रक्रिया प्रकल्प स्थापन केले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार मांडवी नदीचा आमोणे परिसरातील भाग आणि जुवारी नदीचा पंचवाडी ते मडकई पर्यंतचा भाग मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेला आहे.