For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन महिन्यांत 28 कोटींचा कर जमा

06:50 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन महिन्यांत 28 कोटींचा कर जमा
Advertisement

उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची धडपड

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेला यावर्षी 70 कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र सर्व्हर डाऊन, चलन वेळेत न मिळणे आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असूनही एप्रिल व मे महिन्यामध्ये 28 कोटी 48 लाख 29 हजार 747 रुपये कर जमा केला आहे. यामुळे यावर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

मे महिन्यामध्ये 10 कोटी 14 लाख 35 हजार 792 रुपये कर जमा झाला आहे. जून महिन्यामध्येही विनादंड कर भरणे शक्य असल्याने या महिन्यामध्येही अधिक कर जमा होण्याची शक्यता आहे. ऑनलाईनद्वारे आतापर्यंत 10 कोटी  80 लाख 69 हजार 698 रुपये कर जमा झाला आहे. त्यामुळे ऑनलाईनलाच बेळगावच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कर वसुलीसाठी महानगरपालिकेला दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी धडपडत असतात. यावर्षी नवीन वर्षारंभालाच लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्या कामासाठी जुंपण्यात आले होते. याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये सर्व्हर डाऊनमुळे समस्या निर्माण झाली होती. एप्रिल महिन्यामध्ये कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे ती सवलत मिळावी यासाठी अनेकांनी कर भरण्यासाठी धडपड केली होती.

सर्व्हर डाऊन याचबरोबर वेळेत चलन मिळत नव्हते. त्यामुळे अनेकांना सवलत मिळालीच नाही. एप्रिल महिन्यात केवळ 10 ते 15 दिवस सर्व्हर सुरू होते. त्यामुळे अनेक जण सवलतीपासून वंचित राहिले. महानगरपालिकेने याबाबत बेंगळूरच्या नगर विकास विभागाला सवलतीमध्ये वाढ करण्यासाठी पत्रे पाठविली. मात्र नगर विकास खात्याने याबाबत काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे विनासवलत मे महिन्यामध्ये तसेच जून महिन्यामध्ये जनतेला कर भरावा लागत आहे.

जून महिन्याच्या अखेरपर्यंत कर भरला नाही तर जुलैपासून दोन टक्के दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जून महिन्यामध्येही मोठ्या प्रमाणात कर जमा होण्याची शक्यता आहे. बेळगाव वन तसेच महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये जावून कर भरला जात आहे. अजूनही सवलत दिली असती तर अधिक कर जमा झाला असता, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीदेखील जनतेकडून सध्या तरी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement
Tags :

.