‘अप्रेंटिसशिप’मध्ये 27 हजारजणांना प्रशिक्षण
सध्या 12 हजार 500 जण करतात अप्रेंटीसशीप : प्रशिक्षणाबरोबरच रोजगारसंधीच्या वाटा खुल्या
पणजी : राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत मे 2025 पर्यंत राज्यातील 27 हजारांहून अधिक जणांनी सरकारी तसेच खासगी कंपन्यांतून अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या 12 हजार 500 जण अप्रेंटीसशीप प्रशिक्षण घेत आहेत. कौशल्य विकास खात्यातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. 20 जून 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रतिसाद वाढत चालला आहे. अनेक युवक-युवती या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असून या उमेदवारांना अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने पुढील रोजगार अथवा नोकरीसाठी उपयुक्त ठरत आहे. यामध्ये उमेदवाराला एक वर्षाच्या अप्रेंटिसशिप मध्ये त्यांच्या पात्रतेनुसार आणि योजनेच्या नियमांनुसार मानधन दिले जाते. गोव्यातील अप्रेंटिसशिप योजनेचे देश भरात कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयानेही याची दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालय तसेच निती आयोगातर्फे राज्य सरकारचे कौतुक केले आहे. राज्यातील शिक्षित तऊणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.
पोर्टलवर गोव्यातील 400 कंपन्यांनी नोंदणी
सरकारी खात्यांसह, आदरतिथ्य, सेवा, फार्मा, ऑटोमोबाईल, बँकिंग, आरोग्यसेवा, व्यवस्थापन, एचआर आदी क्षेत्रांत अनेक अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध आहेत. यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर गोव्यातील 400 कंपन्यांनी नोंदणी केली आहे. सध्या खासगी कंपनीत विशेष करून आदरातिथ्य क्षेत्रात अनेक अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्याच कंपनीत नोकरी मिळाली आहे. कौशल्य विकास खात्यातर्फे दर तीन महिन्यांनी पीएम अप्रेंटिसशिप मेळाव्यांचे आयोजन केले जाते. याचा मोठ्या प्रमाणात राज्यातील युवक वर्गाला फायदा होत आहे.