राज्यात 26 हजार शिक्षकांची भरती करणार
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती
बेंगळूर : शिक्षक भरतीसाठी शिक्षण खात्याने शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ आता शिक्षणमंत्र्यांनी राज्यात 26 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. लवकरच यासंबंधीची अधिसूचना जारी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शिमोगा येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राज्यात 26 हजार शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता टीईटी होणार असून 23 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 7 डिसेंबर रोजी टीईटी घेण्यात येईल. लवकरच अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या नेमणुकीचाही आदेश दिला जाईल, असे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले.
‘केपीएस’साठी 3 हजार कोटी रु.
राज्यात 800 कर्नाटक पब्लिक स्कूल (केपीएस) शाळा सुरू केल्या जात आहेत. सहावी इयत्तेपासून कन्नडसोबत इंग्रजी शिकण्याचीही संधी देण्यात आली आहे. केपीएस शाळांसाठी 3,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या शाळांसाठी भूमीपूजन होईल. संगणक शिक्षण देण्याचा सल्ला वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. या अनुषंगाने पहिली इयत्तेपासूनच मुलांना संगणक शिकविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.