इंटरकॉन्टिनेंटल कपसाठी 26 संभाव्य फुटबॉलपटू जाहीर
संदेश झिंगनला वगळले, कियान नासिरीचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंटरकॉन्टिनेंटल कपच्या तयारी शिबिरासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या 26 संभाव्य फुटबॉलपटूंची निवड जाहीर करण्यात आली असून प्रभावी सेंटर बॅक संदेश झिंगनचे नाव त्यात नाही, तर ईस्ट बंगालचा दिग्गज इराणी खेळाडू जमशिदचा मुलगा आणि चेन्नईयीन एफसी फॉरवर्ड कियान नासिरी हा भारतीय संघात प्रथमच निवड होण्याच्या जवळ पोहोचला आहे.
मोहन बागानचा राईट-बॅक आशिष राय आणि ईस्ट बंगालचा गोलकीपर प्रभसुखान सिंग गिल, जे अद्याप वरिष्ठ भारतीय संघातून खेळलेले नाहीत, त्यांनाही हैदराबादमध्ये 3 ते 9 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या तीन संघांच्या सदर वार्षिक स्पर्धेच्या तयारी शिबिरासाठी बोलावले गेले आहे. जानेवारीत सीरियाविऊद्ध भारताच्या आशियाई चषक गटातील सामन्यात उजव्या गुडघ्याला दुखापत झालेला प्रमुख बचावपटू झिंगन अद्याप या दुखापतीतून सावरलेला नाही, असे समजते. 31 वर्षीय झिंगन मे महिन्यातील फिफा विश्वचषक 2026 च्या प्राथमिक संयुक्त पात्रता फेरी-2 मधील कुवेत आणि कतारविऊद्धच्या सामन्यांपूर्वी आयोजिण्यात आलेल्या संघाच्या शिबिरातील निवडीसही मुकला होता.
फिफा क्रमवारीत 93 व्या स्थानावर असलेला सीरिया आणि 179 व्या क्रमांकावर असलेले मॉरिशस हे स्पर्धेतील इतर दोन संघ आहेत. भारत सध्या 124 व्या क्रमांकावर आहे. हैदराबादमध्ये 31 ऑगस्टपासून तयारी शिबिर सुरू होणार आहे. इंटरकॉन्टिनेंटल कप ही दिग्गज सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतरची भारतीय संघाची पहिली पूर्ण स्पर्धा असेल आणि गेल्या महिन्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या मार्केझ यांची पहिली कसोटी असेल. भारताने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे.
संभाव्य खेळाडूंची यादी- गोलरक्षक : गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, प्रभसुखान सिंग गिल. बचावपटू : निखील पुजारी, राहुल भेके, चिंगलेनसाना सिंग कोनशाम, रोशन सिंग नौरेम, अन्वर अली, जय गुप्ता, आशिष राय, सुभाशिष बोस, मेहताब सिंग. मिडफिल्डर : सुरेश सिंग वांगजाम, जॅक्सन सिंग, नंदकुमार सेकर, नौरेम महेश सिंग, यासिर मोहम्मद, लालेंगमाविया राल्टे, अनिऊद्ध थापा, सहल अब्दुल समद, लल्लियांझुआला छांगटे, लालथाथांगा ख्वालह्रिंग. आघाडीपटू : कियान नासिरी गिरी, एडमंड लालरिंदिका, मनवीर सिंग, लिस्टन कुलासो.
इंटरकॉन्टिनेंटल कप सामने (सर्व सामने संध्याकाळी 7.30 वा. सुरू होतील)- 3 सप्टेंबर : भारत विऊद्ध मॉरिशस, 6 सप्टेंबर : सीरिया विऊद्ध मॉरिशस, 9 सप्टेंबर : भारत विऊद्ध सीरिया.