Solapur Breaking : २६ लाखांची अवैद्य दारू पाटकुल- टाकळी सिकंदर रोडवर जप्त
पाटकुल प्रतिनिधी
मोहोळ पोलिसांची अवैध दारू तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाई. पाटकुल टाकळी सिकंदर रस्त्यालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या सब स्टेशन लगत २६ लाखांच्या मुद्देमालासह एका संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील पाटकुल टाकळी सिकंदर रस्त्यालगत महावितरण कंपनीच्या सब स्टेशन पाठीमागील शेतामध्ये दि ५ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री एक आयशर टेम्पो व एक पिकअप गाडी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने लावले गेल्याचे मोहोळ पोलिसांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्याठिकाणी तीन ते चार जण आयशर मधून पिकप मध्ये बॉक्स टाकत असताना पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कुबेर निदर्शनास आले, त्यापैकी तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांच्यातील प्रदीप परमेश्वर पवार ( वय २४ रा तांबोळे ता.मोहोळ) हा जागीच पकडला गेला.
सदर घटनास्थळी ०८ लाख रुपये किमतीचा एक चॉकलेटी रंगाचा आयशर (MH -४५- १५०५) व ०५ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची पीकअप (MH -१३ -३५०३) तसेच ०५ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीची इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे १४८ बॉक्स, ०३ लाख ९१ हजार ६८० रुपये किमतीचे रॉयल स्टॅग कंपनीचे ९६ बॉक्स, ३८ हजार ८८० रुपये किमतीचे ल्यांडन प्राइड कंपनीचे ०९ बॉक्स , ०१ लाख ६२ हजार रुपये किमतीचे मॅकडॉल नंबर वन या कंपनीचे ४५ बॉक्स , ०१ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे रॉयल क्लासिक कंपनीचे ९० बॉक्स ६९ हजार ९६० रुपये किमतीचे हँडल वाईट कंपनीचे ५३ बॉक्स असा एकूण २६ लाख १४ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी प्रदीप पवार व त्यांच्या तीन साथीदार आणि विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८०, ८३ प्रमाणे ठाणे अंमलदार समाधान पाटील यांनी मोहोळ पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे करीत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले असून या कारवाईबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी मोहोळ पोलिसांचे अभिंदन केले आहे.