लुहान्स्कमध्ये दिवसभरात 26 हल्ले
रशियाने 800 क्षेपणास्त्र डागल्याचा युक्रेनचा दावा
वृत्तसंस्था /कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. तरीही युक्रेनच्या शहरांवर रशियाचे हल्ले सुरू आहेत. रशियाने लुहान्स्कच्या सेवेरोदोनेट्स्कमध्ये मागील 24 तासांमध्ये 9 वेळा हवाई हल्ले केले असून यात 7 इमारतींना नुकसान पोहोचले आहे. तर लुहान्स्कमध्ये रशियाकडून 26 हल्ले करण्यात आले आहेत. क्रीवी रीच्या निप्रोपेट्रोवस्कमध्ये झालेल्या बॉम्बवर्षावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झला आहे. रशियाच्या सैनिकांनी चेर्नीहीववर हल्ले केले असून तेथे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियाने युद्धाच्या प्रारंभापासून आतापर्यंत सुमारे 800 क्रूज आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs डागली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.
रशियाकडून हल्ला करण्यात आल्यास स्वीडन आणि फिनलंडला मदत करण्याचा प्रस्ताव ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडला आहे. स्वीडनला नाटो सदस्यत्व प्रदान करण्याचा ब्रिटनचा पाठिंबा असल्याचे विधान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. फिनलंडने नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय निश्चित केला आहे. फिनलंड रविवारी नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करणार आहे.
युक्रेनचे प्रत्युत्तर
खारकीव्ह क्षेत्रात युक्रेनच्या सैन्याने स्वतःची 4 गावे रशियाच्या ताब्यातून मुक्त करण्यास यश मिळविले आहे. मागील 24 तासांमध्ये युक्रेनच्या सैन्याने विहिव्का, रुबीझेन आणि अन्य दोन गावांवर नियंत्रण मिळविले आहे. रशियाच्या सीमेपासून केवळ 50 किलोमीटर अंतरावरील खारकीव्ह शहरावर कब्जा करण्यासाठीची लढाई फेब्रुवारीपासून सुरू आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक चाललेल्या भीषण संघर्षात रशियाच्या सैन्याला यश मिळालेले नाही. याचदरम्यान रशियाच्या कब्जाखाली असलेलया भागातून येणाऱया पाइपलाइनमधून गॅस पुरवठा रोखला आहे. या गॅसचा पुरवठा युरोपला होत असतो. पुरवठा रोखला गेल्याने युरोपसाठी अडचणी निर्माण होणार आहेत.
रशियाचा रसद पुरवठा विस्कळीत
युक्रेनचे सैनिक रशियन सैन्याच्या रसद पुरवठय़ावरही हल्ले करत आहेत. हे हल्ले रशियाच्या सीमेत देखील होत आहेत. रशियाच्या सीमावर्ती बेलगोरोड भागातील गावावर युक्रेनच्या सैन्याने गोळीबार केला आहे. रसदपुरवठा विस्कळीत करण्यासाठी हल्ला करूनच युक्रेनच्या सैन्याने रशियाला कीव्हवर कब्जा करण्यापासून रोखले होते.