येरवडा कारागृहात कैद्याकडून 26.69 लाखांचा अपहार
पुणे / वार्ताहर :
येरवडा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन तसेच मनी ऑर्डर रजिस्टरमध्ये फेराफार करुन तब्बल 26 लाख 69 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सचिन रघुनाथ फुलसुंदर या कैद्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत येरवडा कारागृह तुरुंगाधिकारी बापुराव भिमराव मोटे (वय 38) यांनी आरोपी विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.
सचिन फुलसुंदर हा कैदी सन 2006 मधील बलात्कार व खूनाचा प्रयत्न गुन्हयातील आरोपी असून त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिध्द झाल्यावर त्याला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. येरवडा कारागृहात तो बंदिस्त असताना फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2023 यादरम्यान त्याने कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांची नजर चुकवून कारखाना विभागात होणाऱ्या वस्तू बाहेर पाठिण्याचा बहाणा केला. सदर विभागात वारंवार येऊन त्याने तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केला. येरवडा कारागृह येथील 2 ए रजिस्टर (कैद्यांना त्यांचे नातेवाईकांनी केलेल्या मनी ऑर्डर) क्रमांक एक ते सहा मध्ये त्याने फेराफार केला. कारागृह अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, दिनांक, खोटे हिशोब तयार करुन मोघम रकमा स्वत:च्या व इतर कैद्यांच्या नावे दाखवून 26 लाख 69 हजार 911 रुपयांचा अपहार करत फसवणूक केली आहे.
कारागृहात आता ऑनलाइन मनी ऑर्डर
याप्रकरणानंतर येरवडा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यापुढे मनी ऑर्डरची सगळी हस्तलिखित कामे बंद करुन ‘ई-प्रिझन' सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कामे करण्याचे आदेश पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले आहे. त्यामुळे यापुढील कारागृहातील सर्व मनी ऑर्डरची कामे ऑनलाइन स्वरुपात होणार आहे. ई-प्रिझनच्या माध्यमातून यापुढे मनी ऑर्डरचे सर्व व्यवहार करण्यात येतील. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारचे गैरप्रकार रोखले जातील, असे मत येरवडा कारागृह अधिक्षक सुनील ढमाळ यांनी व्यक्त केले आहे.