जिल्ह्यातील 2500 सहकारी संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत
कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्हयातील सुमारे 873 हून अधिक सहकारी संस्था आणि 1665 दूध संस्था अशा एकूण 2538 हून अधिक सहकारी संस्थां निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. लोकसभा निवडणुक आचार संहिता त्यानंतर लगेचच सुरु झालेला पाऊस आणि पुन्हा विधानसभा निवणुक आचारसंहितेच्या कचाट्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका आडकल्या. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली असली तरी अद्याप सहकार विभागाकडुन निवडणुका घेण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने निवडणुक प्रक्रीया ठप्प आहे. राज्यातील सत्तास्थापनेनंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रीयेला गती मिळणार आहे.
जिल्ह्यात सहकार क्षेत्राचे घट्ट जाळे विणले आहे. ग्रामीण भागातील राजकारण गावातील विकास सेवा सोसायट्या, दूध संस्था यासह अन्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालते. तर विधानसभा, लोकसभा निवडणुकांवरही या सहकारी संस्थांचा प्रभाव असतो. त्यामुळे आपआपल्या तालुक्यातील सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यासाठी जिल्हयातील नेत्यांचा प्रयत्न सुरु असतो. मात्र कोरोना संसर्गापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका संथगतीने सुरु आहेत. कोरोना संसर्ग अटोक्यात आल्यानंतर जिल्ह्यात दोन वेळा मोठ्याप्रमाणात आलेला महापूर, त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुक अचारसंहितेमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित पडत आहेत.
जिल्ह्यातील सुमारे 873 हुन अधिक सहकारी संस्था आणि सुमारे 1665 प्राथमिक दूध संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या संस्थांच्या निवडणुका 31 मे पर्यंत स्थगित केल्या होत्या. यानंतर 7 जून रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरु करण्याचे आदेश प्राधिकरणचे सचिव यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरु करण्याच्या हालचाली जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयातून सुरु होत्या. मात्र तोच 20 जून रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा आदेश दिला. सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये लगेचच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या. सध्या विधानसभा निवडणुकीची आचार संहिता 26 रोजी संपली आहे. सहकार विभागाने निवडणुका घेण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे ब आणि क वर्गातील मुदत संपलेल्या संस्थांची निवडणुक प्रक्रीय अद्याप ठप्प आहे.
1665 दूध संस्थांच्या निवडणुका प्रलंबित
जिल्ह्यातील एकूण 2215 प्राथमिक दूध संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. यामधील ड वर्गातील 550 दूध संस्थांची निवडणुक प्रक्रीया पूर्ण झाली आहे. तर ब आणि क वर्गातील 1665 दूध संस्थां निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातंर्गत येणाऱ्या ब वर्गातील 130, क वार्गातील 398 आणि ड वार्गातील 345 अशा एकूण 873 संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सहकारी संस्थांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.
पुन्हा आचारसंहितेत अडकणार निवडणुका
विधानसभा निवडणुकीनंतर नवीन वर्षात महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे. यानंतर पुन्हा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या आचार संहितेत सहकारी संस्थांच्या निवडणुका आडकण्याची शक्यता आहे.