दंडात्मक कारवाईसह अडीचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
मनपाची प्लास्टिक बंदी मोहीम
बेळगाव : प्लास्टिक बंदी असतानाही शहरात 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सोमवारी सकाळी टेंगिनकेरा गल्ली, रविवार पेठ, मेणसे गल्ली, पांगूळ गल्ली या परिसरातील प्लास्टिक दुकानांची तपासणी करून 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे 250 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात प्लास्टिकचा कचरा भरमसाट वाढत आहे. सध्या महापालिका आयुक्त शुभा बी. या शहराचा वॉर्डनिहाय आढावा घेत आहेत. यावेळी सर्वत्र साचलेले प्लास्टिकचे ढिगारे त्यांच्या निदर्शनास येत आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र करण्यात आली. शहरात 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकची विक्री केली जात होती. बंदी असतानाही प्लास्टिकची विक्री होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित दुकानांवर कारवाई केली. एकूण बारा दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.