‘एसएफएस’ जिल्ह्यात करणार 250 कोटींची गुंतवणूक
744 जणांना मिळणार रोजगार : 91 योजनांमध्ये एकूण 7,660 कोटींच्या गुंतवणुकीला सरकारची मंजुरी
बेंगळूर : राज्य सरकारने राज्यातील औद्योगिक क्षेत्रात अधिक भांडवल गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले असून 91 योजनांमध्ये एकूण 7,660 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. एसएफएस ग्रुप इंडिया प्रा. लि. कंपनी बेळगाव जिल्ह्यात 250 कोटींची गुंतवणूक करणार आहे. सदर कंपनी आपल्या शाखेचा विस्तार करणार आहे. यामुळे 844 जणांना रोजगार मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बेंगळूरमधील ‘कर्नाटक उद्योगमित्र’ कार्यालयात अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय सिंगल विंडो समितीच्या 140 व्या बैठकीत विविध कंपन्यांच्या भांडवल गुंतवणुकींना मंजुरी देण्यात आली. सदर योजनांमधून सुमारे 18,146 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. एसएफएस ग्रुप इंडिया प्रा. लि. या कंपनीची सध्या होनगा, हत्तरगी येथे शाखा आहे. याशिवाय पुणे येथेही तीन शाखा आहेत. एसएफएस कंपनी इंजिन व्हॉल्व्ह, टर्बोचार्जरचे भाग, इंधन पुरवठ्याचे सुटे भाग, कोल्ड फोर्जिंग, रॉकर आर्म स्क्रू, फ्लूएड पॉवर असेंब्ली, एरोस्पेस आणि संरक्षणविषयक उपकरणांच्या सुट्या भागांची निर्मिती करते.
एकूण मंजूर प्रस्तावांपैकी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या 25 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांमधून सुमारे 5,750.73 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल तर 13,742 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे अशी माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी दिले. 15 कोटी ते 50 कोटी रुपये दरम्यान गुंतवणुकीच्या 57 नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्यातून 1,145 कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे 4,404 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय अतिरिक्त भांडवली गुंतवणुकीच्या 8 योजनांना मंजुरी देण्यात आली असून, याद्वारे 763.85 कोटींची गुंतवणूक होणार आहे. बैठकीप्रसंगी उद्योग मित्र खात्याचे मुख्य सचिव डॉ. एस सेल्वकुमार, वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या आयुक्त गुंजन कृष्णा, कामगार खात्याचे सचिव मोहम्मद मोहसीन, केआयएडीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. महेश, आयटी-बीटी खात्याचे संचालक एच. व्ही. दर्शन आणि कर्नाटक उद्योग मित्रचे व्यवस्थापकीय संचालक दो•बसवराजू आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळालेल्या प्रमुख कंपन्या.....
- कंपनी : प्रतिभा पाटील शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि
- स्थान : कन्नूर, विजापूर तालुका, विजापूर जिल्हा
- गुंतवणूक : 489.50 कोटी रुपये.
- रोजगार : 275
- कंपनी : गुरुदेव रिफायनरीज आणि अलाईड इंडस्ट्रीज
- स्थान : ताडवलग, विजापूर जिल्हा
- गुंतवणूक : 488.49 कोटी रुपये.
- रोजगार: 255
- कंपनी : देवश्री इस्पात प्रा. लि.
- स्थान : हलवर्ती, कोप्पळ जिल्हा
- गुंतवणूक : 470 कोटी रुपये.
- रोजगार : 800
- कंपनी : एकस कन्झ्युमर प्रॉडक्टस् प्रा. लि.
- ठिकाण : इत्तीगट्टी, धारवाड जिल्हा
- गुंतवणूक. : 456 कोटी रुपये.
- रोजगार : 1,187
- कंपनी : इंटिग्रेटेड सोलर पॉवर प्रा. लि.
- ठिकाण : मिंडहल्ली, कोलार जिल्हा
- गुंतवणूक : 441.08 कोटी रुपये.
- रोजगार : 720
- कंपनी : साउथ वेस्ट मायनिंग लि.
- स्थान : मूसिनायकानहळ्ळी, बळ्ळारी जिल्हा
- गुंतवणूक : 411 कोटी रुपये.
- व्यवसाय : 65
- कंपनी : शशी अलॉयज प्रा. लि.
- स्थान : भैरनायकनहळ्ळी, चळ्ळकेरे तालुका, चित्रदुर्ग
- गुंतवणूक : 380 कोटी रुपये.
- रोजगार : 400
- कंपनी : एसएफएस ग्रुप इंडिया प्रा. लि.
- ठिकाण : बेळगाव जिल्हा
- गुंतवणूक : 250 कोटी रुपये.
- रोजगार : 844
- कंपनी : म्हैसूर पेट्रोकेमिकल्स लि.
- ठिकाण : रायचूर जिल्हा
- गुंतवणूक : 240 कोटी रुपये.
- नोकरी : 157
- कंपनी : लॅम रिसर्च इंडिया प्रा. लि.
- ठिकाण : बेंगळूर
- गुंतवणूक : रु. 235.91 कोटी.
- रोजगार : 1,724
- कंपनी : टाटा सेमीकंडक्टर असेंबली अॅण्ड टेस्ट प्रा. लि.
- ठिकाण : कोलार जिल्हा
- गुंतवणूक : 200 कोटी रुपये
- रोजगार : 155
- कंपनी : मारुती सुझुकी इंडिया लि.
- स्थान : बेंगळूर ग्रामीण जिल्हा
- गुंतवणूक : 137 कोटी रुपये.
- रोजगार : 1,908