आझाद गल्लीत दुकानातील गल्ल्यातून 25 हजार रुपये लांबविले
काही क्षणात चोरट्याची करामत : व्यापाऱ्यांत भीती
बेळगाव : भरदिवसा मार्केटयार्डमधील दोन अडत दुकानात घुसून रोकड पळविल्याची घटना ताजी असतानाच बाजारपेठेतील एका दुकानात घुसून गल्ल्यातील 25 हजार रुपये पळविण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी आझाद गल्ली येथे ही घटना घडली आहे. आझाद गल्ली येथील मनोज कटलरी या स्टेशनरी दुकानात चोरीची घटना घडली आहे. दुकान मालकाने खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून चोरट्याची करामत सीसीटीव्ही पॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.
शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. दुकान मालक काही क्षणांसाठी आपल्याच शेजारच्या दुकानात गेले होते. तेथून परत येईपर्यंत दुकानात शिरलेल्या एका अज्ञाताने गल्ल्यातील रक्कम पळविली आहे. पांगुळ गल्ली, आझाद गल्ली परिसरात गल्ल्यातील रोकड पळविण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत रोज गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी येणाऱ्यांच्या खिशातून मोबाईल पळविणे, रक्कम पळविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गर्दीचा फायदा घेत गुन्हेगार सक्रिय झाले असून गर्दीच्या वेळी बाजारपेठेत पोलिसांचा वावर असूनही असे गुन्हे घडू लागले आहेत.