बस उलटून 25 प्रवासी जखमी
अंकोला-हुबळी राष्ट्रीय हमरस्त्यावरील वज्रळ्ळी येथे अपघात
बेळगाव : केएसआरटीसी बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात उलटून 25 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील वज्रळ्ळी येथे मंगळवारी घडली. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवारहून रायचूरकडे निघालेल्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून अंकोला-हुबळी हमरस्त्यावरील राष्ट्रीय हमरस्ता क्र. 63 वज्रळ्ळी येथे बस रस्त्याच्या बाजुला उलटली. या अपघातात लहान मुले, महिलांसह 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अतिवेगामुळेच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, असे सांगण्यात आले. खड्ड्यात पलटी झाल्याने बसचे चाक निखळल्याचे घटनास्थळावरून दिसून येत होते. नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.