खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 25 जवानांना उलटी-जुलाब
सरकारी इस्पितळात उपचार, जवानांची प्रकृती धोक्याबाहेर
खानापूर : खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 25 जवानांना सोमवारी सकाळी उलटी, जुलाब सुरू झाल्याने सर्व बाधितांना येथील सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व बाधित जवानांवर उपचार करण्यात आले असून अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे तालुका आरोग्याधिकारी महेश किवडसन्नावर यांनी सांगितले. खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी नव्याने जवान दाखल झाले आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्याने काही जवानांनी बाहेरचे अन्न खाल्याने सोमवारी पहाटेपासून उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाचवेळी पंचवीस-तीस जणांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रमुखांची तारांबळ उडाली. तातडीने सर्वांना खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर झाल्याने सायंकाळी उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते सुरेश जाधव, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, भरतेश तेरोजी यांसह अनेकांनी रुग्णालयात भेट देऊन जवानांची विचारपूस केली.