बार्बाडोस कसोटीत दोन दिवसांत 24 विकेट्स
विंडीजचा संघ 190 धावांत ऑलआऊट : दुसऱ्या डावातही कांगारुंची भंबेरी, दिवसअखेरीस 4 बाद 92 धावा
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याचे संकेत दिसत आहेत. बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. ऑस्ट्रेलियन फलंदाज टॅव्हिस हेडचे एक अर्धशतक सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. विशेष म्हणजे, दोन दिवसांत 24 विकेट्स पडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी विंडीजचा पहिला डाव 190 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचीही खराब सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारुंनी 4 गडी गमावत 92 धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना यजमान वेस्ट इंडिजने पाहुण्या कांगारुंना अवघ्या 180 धावांत गुंडाळले. ट्रॅव्हिस हेडच्या 59 धावा वगळता संघातील अन्य एकाही खेळाडूला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. यानंतर यजमान संघही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही.
विंडीज संघाला 10 धावांची आघाडी
ऑस्ट्रेलियन संघाला 180 धावांवर रोखल्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने कर्णधार रोस्टन चेस 44 (108) आणि यष्टीरक्षक फलंदाज शाय होप 48 (81) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 190 धावा करत कॅरेबियन संघाने 10 धावांची नाममात्र आघाडी घेतली. याशिवाय, अल्झारी जोसेफने नाबाद 23 धावांचे योगदान दिले. केसी कार्टीने 20 तर ब्रेंडॉन किंगने 26 धावा फटकावल्या. इतर विंडीज फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 गडी बाद केले. याशिवाय, कर्णधार पॅट कमिन्स, हेजलवूड आणि वेबस्टर यांनी प्रत्येकी दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांची शरणागती
दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावातही शरणागती पत्करल्याचे पहायला मिळाले. सलामीवीर सॅम कोन्स्टास 5 धावा करुन स्वस्तात बाद झाला. जोसेफने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी उस्मान ख्वाजा (15) आणि कॅमरुन ग्रीन (15) हे दोघेही फार काळ मैदानावर टिकले नाहीत. तर जोस इंग्लिसला क्लीन बोल्ड करत सील्सने कांगारुंना चौथा धक्का दिला. यानंतर दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 92 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. टॅव्हिस हेड 13 तर वेबस्टर 19 धावांवर खेळत होते. पाहुण्या ऑसी संघाकडे 82 धावाची आघाडी आहे.
यासह दोन दिवसांच्या खेळात यजमान वेस्ट इंडिजच्या 10 आणि पाहुण्या संघाने गमावलेल्या 14 अशा या सामन्यात एकूण 24 विकेट्स पडल्या आहेत. हा सामना निकाली लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून कोण कुणाचा खेळ खल्लास करणार ते पाहण्याजोगे असेल.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 180
विंडीज पहिला डाव 190
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 33 षटकांत 4 बाद 92 (सॅम कोन्स्टास 5, उस्मान ख्वाजा 15, कॅमरुन ग्रीन 15, जोस इंग्लिस 12, टॅव्हिस हेड नाबाद 13, वेबस्टर नाबाद 19, सील्स, शेमार जोसेफ, अल्झारी जोसेफ आणि जस्टीन ग्रेव्ह्ज प्रत्येकी 1 बळी).