तिसऱ्या दिवशीही 24 भटक्या कुत्र्यांना लस
बेळगाव : शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांना महापालिका व पशुसंगोपन खात्याकडून मोहिमेच्या तिसऱ्या दिवशीदेखील लस टोचण्यात आली. बुधवारी शास्त्राrनगर आणि विद्यानगर परिसरात 24 भटकी कुत्री पकडून त्यांना अँटीरेबीज लस देण्यात आली. जिकडे तिकडे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र कुत्र्यांच्या पैदासीवर नियंत्रण मिळविण्यात महानगरपालिकेला अपयश आले. कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास संबंधित रुग्णांनी त्यावर तातडीने योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे. रेबीज रोगावर अद्याप उपचार नसल्याने एकदा रेबीजची लागण झाल्यास त्या रुग्णाचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने महापालिका आणि पशुसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्यांना रेबीज लस टोचली जात आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शास्त्राrनगर व विद्यानगर परिसरातील 24 भटक्या कुत्र्यांना उचगाव पशू दवाखान्याचे डॉ. दीपक यलिगार यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने कुत्र्यांना लस टोचली.