कॅलिफोर्नियात वणव्यामुळे 24 जणांचा मृत्यू
मृतांमध्ये ऑस्ट्रेलियन अभिनेत्याचा समावेश : 7 दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण नाही
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात भडकलेल्या वणव्यामुळे 24 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये ऑस्ट्रेलियन अभिनेता रोरी साइक्स देखील सामील आहे. तर मागील 7 दिवसांपासून भडकलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही. ईटन आणि पॅलिसेड्समध्ये 16 जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
लॉस एंजिलिसमध्ये रविवारी वाऱ्याचा वेग मंदावल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळाली. परंतु रात्री उशिरा पुन्हा जोरदार वारे वाहणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला. यामुळे लॉस एंजिलिसच्या दोन जंगलांमध्ये लागलेली आग वेगाने विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीची व्याप्ती 40 हजार एकर जमिनीपर्यंत पोहोचली आहे. काउंटीच्या सर्व लोकांना पूर्व इशारा देण्यात आला असून त्यांना कधीही घर सोडण्यास सांगितले जाऊ शकते.
ट्रम्प यांच्याकडून संताप व्यक्त
आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजिलिसच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांची निंदा केली आहे. लॉस एंजिलिसमध्ये अद्याप आग भडकत असून अयोग्य नेत्यांनाच आग कशी विझवावी हेच माहित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगीमुळे 12 लाख कोटीचे नुकसान
लॉस एंजिलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 11.60 लाख कोटीपासून 13 लाख कोटी रुपयांचे (135-150 अब्ज डॉलर्स) नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लॉस एंजिलिसमध्ये आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले आहे. लोकांना मास्क परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास मदत करण्यासाठी मेक्सिकोतून अग्निशमन कर्मचारी लॉस एंजिलिसमध्ये दाखल झाले आहेत.
हॅरिस यांच्या घरात चोरीचा प्रयत्न
दुसरकडे लॉस एंजिलिस पोलीस विभागानुसार ब्रेटनवुड येथील उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. हे दोन्ही आरोपी चोरीच्या उद्देशानेच हॅरिस यांच्या घरी पोहोचले होते हे सिद्ध करण्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.
वॉटर हायड्रेंट रिकामी
लॉस एंजिलिसच्या जलविभागानुसार आग लागण्यापूर्वी कॅलिफोर्नियातील सर्व वॉटर हायड्रेंट पूर्णपणे सुरू होते. आग विझविण्यासाठी पाण्याच्या अधिक मागणीमुळे यंत्रणेवरील दबाव वाढला आणि पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. यामुळे 20 टक्के वॉटर हायड्रेंटवर याचा प्रभाव पडला आणि त्यातील पाण्याचा साठा संपुष्टात आला. कॅलिफोर्नियात अनेक ठिकाणी वॉटर हायड्रेंट कोरडे पडले आहेत. प्रांताचे गव्हर्नर गॅविन न्यूजॉम यांनी वॉटर हायड्रेंडमधील पाणी इतक्या लवकर कसे संपेल याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सांता मोनिका शहरात लूट
आगीच्या संकटादरम्यान कॅलिफोर्नियाच्या सांता मोनिका शहरात लूटीची घटना घडली आहे. यानंतर प्रशासनाने संचारबंदी घोषित केली आहे. तर लूट प्रकरणी 29 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी दोन जण हे अग्निशमन दलाच्या गणवेशात आढळून आले आहेत.