मुत्यानट्टीला 24 तास पाणीपुरवठा : मंत्री भैरती सुरेश
बेळगाव : मुत्यानट्टी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती.प्रत्येक घराला 24 तास सतत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी 5 लाख रुपये खर्चून ओव्हरहेड पाणी टँक बांधण्यात आली आहे, असे नगरविकास मंत्री भैरती सुरेश म्हणाले. मुत्यानट्टी परिसरात बुधवार दि. 10 रोजी नव्याने बांधलेल्या पाच लाख लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड टँकचे उद्घाटन करून मंत्री भैरती सुरेश बोलत होते. टँकच्या बांधकामामुळे प्रभाग क्र. 55 मधील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. केयुवायडीएफसी, महानगरपालिका, जागतिक बँक, केयुडब्ल्यूएसएमपी 24 तास पाणीपुरवठा योजनेमुळे अनेकांना फायदा होईल. वीज जोडणीशिवाय ओव्हरडेड टँकच्या माध्यमातून उतारावरून पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे सुमारे 4 हजार लोकांच्या पिण्याची पाण्याची समस्या सुटणार आहे. बेळगाव जिल्ह्याला नगरविकास खात्याकडून 100 कोटी देण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे 25 कोटी मुख्यमंत्री अनुदानात जोडले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
बेळगावच्या विविध भागातील पाणीसमस्या दूर करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. अशाचप्रकारे बेळगाव जिल्ह्यातही पाणीसमस्या सोडविण्यासाठी ओव्हरहेड टँक बांधण्याची योजना आखण्यात आली आहे, असे ते म्हणाले. आमदार असिफ सेठ म्हणाले, वर्षभरापूर्वी मुत्यानट्टी गावात पाण्याची तीव्र समस्या होती. काही ठिकाणी केवळ बोअरवेल होते. ही समस्या लक्षात घेत या भागात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 5 लाख रुपये खर्चून टँक उभारण्यात आली. जेणेकरून पाण्याची कमतरता भासू नये. त्याचप्रमाणे रस्ते आणि गटार बांधकामासह आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. केयुआयडीएफसीचे अध्यक्ष नारायणस्वामी म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विविध सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पामध्येही ही तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ठिकाणी टँक उभारले जात आहेत. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., केयुआयडीएफसीचे मुख्य अभियंता नंदिश जी. आर. यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.