शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 कोटी जमा
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती: सांखळीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कार्यक्रम
प्रतिनिधी/ साखळी
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकारचे असलेले प्रेम व्यक्त केले आहे. गोव्यात आतापर्यंत या योजनेद्वारे सुमारे 6 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे 24 कोटी ऊपये जमा करण्यात आलेले आहेत. दर एका शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत 1 लाख 20 हजार ऊपये जमा झाले असून काल एकाच दिवशी गोव्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1 कोटी 20 लाख ऊपये जमा होणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
आज या शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन देत असताना क्रेडिट कार्डची सोय करून देण्यात आली असून या क्रेडिट कार्डद्वारे कोणताही शेतकरी आपली शेती गहाण न ठेवता बँकांमधून किमान एक लाख ऊपयेपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. जर कोणतीही बँक शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यास मनाई करत असेल तर त्यांनी थेट आपल्या भागातील विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाला किंवा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा व स्वत:ला कर्ज मिळवून घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे आयोजित पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांच्यासमवेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, सांखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
गोव्यात आज फलोत्पादन क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले असून आजपर्यंत गोवा भाजीपाला शेजारील राज्यांतून विकत घेत होता. मात्र आज लोकांनी फलोत्पादन क्षेत्रात भाजी व इतर उत्पादन लागवडीत दिलेली भर व केलेली क्रांती यामुळे गोव्यातून भाजीची निर्यात बाहेरील राज्यांमध्ये होत आहे. ही एक या सरकारची मोठी उपलब्धी असून राज्य सरकारनेही गोव्यातील शेतकऱ्यांना सदैव सन्मान व सर्व बाबतीत सहकार्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गोव्यात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आतापर्यंत सुमारे 16 हजार शेतकऱ्यांची नोंदणी होती. परंतु कुळ जमिनीच्या मुद्द्यामुळे सुमारे 10 हजार शेतकऱ्यांची किसान कार्डे रद्द झाल्याने आज सुमारे 6 हजार शेतकरी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. गोवा सरकारही शेतकरी प्रगत व आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा यासाठी विविध योजना अंमलात आणत असून या योजनांचा लाभ घेत अनेक शेतकरी शेतात उतरत आहेत. युवा पिढीतील अनेकजण आज कृषी क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांना भर देत शेतीमधील विविध प्रयोग अंमलात आणत आहेत. त्यामुळे गोव्यातही शेती बागायतीला भविष्यात चांगले दिवस नक्कीच येणार, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.