मेक्सिकोमध्ये आगीत 23 जणांचा मृत्यू
किराणा स्टोअर्सला आग : 12 जखमींवर उपचार सुरू
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोमधील हर्मोसिलो शहराच्या मध्यभागी असलेल्या एका डिस्काउंट स्टोअरमध्ये लागलेल्या आगीत किमान 23 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 12 जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुर्घनटेनंतर पोलीस सध्या आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीच्या विळख्यात सापडलेले स्टोअर्स लोकप्रिय डिस्काउंट चेन ‘वाल्डो’च्या मालकीचे होते. आगीचे नेमके कारण सध्या निश्चित करता आले नाही. मात्र, हल्ला किंवा स्फोट अशा शक्यताही पडताळून पाहिल्या जात आहेत.
आगीच्या घटनेची माहिती समजताच 40 कर्मचारी आणि 10 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या. मात्र, आगीचा भडका प्रचंड असल्यामुळे स्टोअर्समधील लोकांना वाचविण्यात प्रचंड अडचणी आल्या. अवघ्या काही मिनिटांमध्ये आग भडकल्यामुळे गोंधळ उडाला. आता आग विझवण्यात आली असली तरी त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तथापि, काही माध्यमांनी विद्युत बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे वृत्त दिले आहे.
सोनोरा राज्याचे राज्यपाल अल्फोन्सो दुराझो यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मी अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी सखोल आणि पारदर्शक चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे अॅटर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी फॉरेन्सिक वैद्यकीय सेवेचा हवाला देत बहुतेक मृत्यू विषारी वायू श्वासोच्छवासामुळे झाल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले आहे.