23 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकन नौदलाकडून अटक
वृत्तसंस्था/ रामेश्वरम
श्रीलंकन नौदलाने 23 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. मासेमारी करण्यासाठी श्रीलंकेच्या समुद्री हद्दीमध्ये प्रवेश केल्यामुळे ही कारवाई झाल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. 23 मच्छिमारांसह तीन ट्रॉलर्सही नौदलाने ताब्यात घेतले आहेत. मच्छिमारांना श्रीलंकेतील कानकेसंथुराई बंदरात नेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेले मच्छिमार रामेश्वरम जेट्टीवरून शनिवार, 9 नोव्हेंबरला मासेमारीसाठी रवाना झाले होते. रविवारी दुपारपर्यंत ते किनाऱ्यावर परतणे अपेक्षित होते. मात्र, सायंकाळी त्यांच्या अटकेची माहिती मत्स्य विभागाला प्राप्त झाली आहे. कचाथीवू बेटाजवळ मासेमारी करत असलेल्या 23 मच्छिमारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडताना श्रीलंकन नौदलाच्या देखरेख कर्मचाऱ्यांनी पकडले. ही बातमी रामेश्वरममध्ये पसरताच मच्छिमार संघटनांनी चिंता व्यक्त करत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना वाचवण्याची विनंती केली.
जूनपासून वार्षिक मासेमारीची बंदी संपुष्टात आल्यापासून श्रीलंकन नौदलाने 300 हून अधिक भारतीय मच्छिमारांना अटक करतानाच सुमारे 30 ट्रॉलर्स जप्त केले आहेत. श्रीलंका सरकार सदर मच्छिमारांना 6 महिने ते दोन वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा ठोठावत आहे.