प्रारूप प्रभाग रचना आराखडयावर २२९ हरकती
सांगली :
सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी विक्रमी २२९ हरकती दाखल झाल्या. हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८६ हरकती दाखल झाल्या. या हरकतीवर पुढील आठवडयात जिल्हाधिकारी अगर त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होवून हा आराखडा अंतिम मंजूरीसाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आला. पालिकेच्या निवडणूकीसाठी २० प्रभाग निश्चित करण्यात आले असून या वीस प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. वीसपैकी सांगली मिरजेतील दोन प्रभागातून प्रत्येकी तीन तर उर्वरित १८ प्रभागातून प्रत्येकी चार नगरसेवक निवडून जाणार आहेत.
निवडणूकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. यानुसार सरासरी १७ हजार ते २५ हजार लोकसंख्येचे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखडयावर हरकती दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर हा अखेरचा दिवस होता. शेवटच्या दिवशी १८६ हरकती दाखल झाल्या तर एकूण २२९ हरकती दाखल झाल्या. भारतीय ब्ल्यू पॅथरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गोंधळे यांनी प्रारूप प्रभाग रचना चुकीची झाल्याचे म्हंटले आहे. मागासवर्गीयासाठी ११ प्रभाग आहेत. ते वाढून १४ झाले असते. ही संख्या वाढू नये यासाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. ही प्रभाग रचना रद्द करून नव्याने जनगणना करून रचना करावी अशी मागणी केली आहे. सतिश साखळकर यांनी प्रभाग दोन, तीन तसेच गावभाग प्रभाग १४ व सांगली प्रभाग १५ गणेशनगरच्या रचनेवर हरकत घेतली आहे.
- आता नजरा आरक्षणाकडे
दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या. त्यावर पुढील आठवडयात सुनावणी होवून प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा मंजूर होईल. प्रारूप प्रभाग रचनेमध्ये फारशे बदल करण्यात आलेले नाहीत. मनपाच्या सन २०१८ साली झालेल्या निवडणूकीसारखीच ही प्रभाग रचना आहे. आता इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेववकांच्या नजरा खऱ्या अर्थाने आरक्षणाकडे लागलेल्या आहेत. या आरक्षण सोडतीत कोणाची दांडी उडणार व कोणाला लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मनपावर सांगलीतून ४३ मिरजेतून २३ तर कुपवाडमधून १२ नगरसेवक निवडून जाणार आहेत.