कारवार जिल्ह्यात दहावीच्या पहिल्या पेपरला 220 विद्यार्थी गैरहजर
कारवार : शुक्रवारी झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या पेपरला जिल्ह्यातील 220 विद्यार्थी गैरहजर राहिले. यामध्ये कारवार शैक्षणिक जिल्ह्यात समावेश होत असलेल्या कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यातील 126 विद्यार्थ्यांचा आणि शिरसी शैक्षणिक जिल्ह्यात समावेश होत असलेल्या हल्ल्याळ, जोयडा, शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर व मुंदगोड तालुक्यातील 94 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यातील दहावी परीक्षेच्या सर्व केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा पार पडल्याचे सांगण्यात आले. कारवार शैक्षणिक जिल्ह्यातील 9 हजार 335 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 9 हजार 209 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 126 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.
अंकोला तालुक्यातून 1143 पैकी 8, भटकळ 2210 पैकी 12, होन्नावर 1941 पैकी 15, कारवार तालुक्यातील 1943 पैकी 81 विद्यार्थ्यांनी आणि कुमठा तालुक्यातील 2098 पैकी 10 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. शिरसी शैक्षणिक जिल्ह्यातील 9 हजार 654 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 9560 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले आणि 94 विद्यार्थी गैरहजर राहिले. शिरसी तालुक्यातील 2772 पैकी 27, सिद्धापूर तालुक्यातील 1209 पैकी 3, यल्लापूर तालुक्यातील 961 पैकी 9, मुंदगोड तालुक्यातील 1267 पैकी 18, हल्ल्याळ तालुक्यातील 2692 पैकी 27 आणि जोयडा तालुक्यातील 803 पैकी 10 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर होत असलेल्या परीक्षेची पाहणी करण्यासाठी येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात वेबकास्टची व्यवस्था करण्यात आली होती.