कराचीच्या तुरुंगातून 216 कैद्यांचे पलायन
भूकंपानंतर गोंधळाच्या स्थितीचा लाभ घेत पसार : 80 हून अधिक कैद्यांना पुन्हा पकडले
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या कराची येथील मलिर तुरुंगातून सोमवारी रात्री 216 कैदी फरार झाले. तुरुंग प्रशासनानुसार कराचीत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर खबरदारीदाखल कैद्यांना बॅरकबाहेर काढण्यात आले होते. यादरम्यान संधीचा लाभ घेत कैदी मुख्य प्रवेशद्वारातून फरार झाले. यातील सुमारे 80 कैद्यांना पुन्हा पकडण्यात आले आहे, तर 135 कैदी अद्याप फरार आहेत. तुरुंग महानिरीक्षक अरशद शाह यांनी मंगळवारी पहाटे या प्रकाराची पुष्टी दिली.
कैद्यांनी कुठलीही भिंत तोडून पलायन केलेले नाही, सर्व कैदी मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान पसार झाल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे. भूकंपानंतर 700-1000 कैद्यांना बॅरकबाहेर आणले गेले होते, याच अफरातफरीत 100 हून अधिक कैद्यांनी मुख्य प्रवेशद्वारानजीक धक्काबुक्की सुरू केली आणि पळ काढला असा दावा प्रांताचे गृहमंत्री लांजार यांनी केला. तर तुरुंग प्रशासनानुसार शोधमोहीम अद्याप जारी आहे. या मोहिमेत स्पेशल सिक्युरिटी युनिट, रॅपिड रिस्पॉन्स फोर्स, रेंजर्स आणि फ्रंटियर कोरची पथके मिळून काम करत आहेत.
एका कैद्याचा मृत्यू, 4 जवान जखमी
या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असून 4 सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. प्रशासकीय बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे प्रांताच्या गृहमंत्र्यांनी मान्य केले आहे. तर मुख्यमंत्री मुराद अली शाह यांना पूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना तुरुंगात जात स्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक फरार कैद्याची ओळख अन् नोंदी उपलब्ध आहेत. कैद्यांचे घर आणि आसपासच्या भागांमध्ये छापे टाकले जात आहेत असे गृहमंत्री लांजार यांनी सांगितले.