215 विद्यार्थ्यांचे नायजेरियात अपहरण
12 शिक्षकांचाही समावेश : बंदूकधाऱ्यांचा सुरक्षा रक्षकांवर गोळीबार
वृत्तसंस्था/ अबुजा
नायजेरियाच्या पश्चिम भागात एका कॅथोलिक बोर्डिंग स्कूलवर बंदूकधारींनी हल्ला करत 200 हून अधिक शाळकरी मुलांचे अपहरण केले. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील अपहरणाच्या सर्वात मोठ्या घटनांपैकी ही एक आहे. आगवारा स्थानिक सरकारच्या पापीरी समुदायातील कॅथोलिक संस्था सेंट मेरी स्कूलमध्ये हा हल्ला करत अपहरण करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी 215 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त माध्यमांनी सरकारी हवाल्याने दिले आहे. या घटनेमुळे नायजेरियाचे राष्ट्रपती बोला टिनुबू यांनी दक्षिण आफ्रिकेतील जी-20 शिखर परिषदेचा जाण्याचा त्यांचा दौरा रद्द केला आहे. आता उपराष्ट्रपती काशिम शेट्टीमा शिखर परिषदेत नायजेरियाचे प्रतिनिधित्व करतील.
अपहरण केलेल्या शाळकरी मुलांमध्ये त्यांचे 7 ते 10 वयोगटातील विद्यार्थीही असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात असून अपहरणकर्त्यांनी खंडणी मिळविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी आणि शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे अपहरण झाल्यापासून या भागात लष्कर आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचे नायजर स्टेट पोलीस कमांडने सांगितले. सेंट मेरीज नामक एका माध्यमिक शाळेत ही घटना घडली आहे. यामध्ये 50 हून अधिक वर्गखोल्या आणि वसतिगृहही आहे. ही शाळा येल्वा आणि मोक्वा शहरांना जोडणाऱ्या एका प्रमुख रस्त्याजवळ आहे.