२१ टीएमसी पाण्याला अधिकारी व ठेकेदाराकडून लागली गळती !
योजना दगडाखाली गाढण्याचे काम सुरु !
धाराशिव प्रतिनिधी
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी २००४ साली छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने निर्णय झाला होता. यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्या २१ टीएमची पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी धाराशिव, लातूर व बीड या जिल्ह्यासाठी मिळणार आहे. यासाठी शासनाने कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना अधिकारी व गुत्तेदाराने निवेदाप्रमाणे काम न करता योजना कशी बारगळे व तिचा बोजवारा उडेल ? यासाठी प्रयत्न करून एक प्रकारे हरताळ फासल्याने या योजनेलाच अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने गळती लागल्याचे वास्तव चित्र साईटवर दिसून येत आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळावे यासाठी मंत्रिमंडळात रणकंदन झाल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेला गती दिली. त्यापैकी ७ टीएमसी योजनेसाठी जवळपास ५ हजार कोटी रुपयांच्या सुधारित निधीस मान्यता दिली आहे.कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना ३२४ कोटी रुपये तर निरा भीमा बोगदा योजनेसाठी २२५ कोटी रुपये व इतर कामासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी पंप हाऊस ते कालवा ५४० मीटर भूमिगत पाईप लाईन करण्यासाठी ७ कोटी १६ लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. तसेच हे काम छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील निर्माण गोल्ड कंट्रक्शन कंपनीस दिले आहे. हे काम ६ महिन्यांच्या आत संपविण्याची मुदत असून पांगरदरवाडी टप्पा क्रमांक ४ डिलिव्हरी चेंबर हे काम सुरू आहे. ५४० मीटरपैकी १५० मीटर पाईप लाईनवर माती व सौम्य मुरुम टाकणे बंधनकारक आहे. मात्र ठेकेदाराने जेसीबीच्या बकेटमध्ये न मावणारी म्हणजेच मोठमोठाली दगडे टाकून ती पाईप लाईन बुजविलेली आहे. यामुळे पाईपलाईनचा पाईपला इजा होण्याची शक्यता असून भविष्यात ही पाईपलाईन फुटू शकते. गुत्तेदाराने मातीचे व सौम्य मुरुमाचे पैसे वाचून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे याला पाठवल देण्याचे काम संबंधित अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील पाण्याचा असलेला अनुशेष दूर व्हावा. तसेच या भागातील क्षेत्र जलसिंचनाखाली येऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशा पोटी ही योजना सुरू असली तरी अधिकारी व ठेकेदाराच्या मिलीभघत वृत्तीमुळे या योजनेस दगडाखाली गाढण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात पांगरदरवाडी ग्रामस्थांनी हे काम निकृष्ट होत असल्यामुळे प्रत्यक्ष ठिकाणी येत ते काम बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. तर लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्या कडून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवीत संबंधित गुतेदाराने ते काम पुन्हा त्याच जोमाने करीत उरकण्याचा सपाटा लावला आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ते काम निविदाप्रमाणे करावे अशा सूचना ठेकेदाराला दिल्या होत्या. मात्र ठेकेदाराने निविदे प्रमाणे काम न करताच दगडे टाकून पाईपलाईन मोजण्याचे काम केले आहे. त्या कामाचे उत्खनन करून पुन्हा नव्याने करण्यात येईल. तसेच संबंधित कंपनी व दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी सांगितले.
माझ्याकडे या कामाच्या बाबतीत लेखी तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा असल्याचे आश्वासन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.पांगरदरवाडी येथील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सहाय्यक अभियंता रोहन पवार हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले असता हे काम नियमबाह्य करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. करण पाईपच्या बुडापासून ते जमीन लेव्हलपर्यंत मोठ मोठाले दगड बुजून वरती देखील दगड अंथरलेले दिसून आले. त्यावेळी संबंधित कंपनीच्या अभियंता शिंदे यांना हे काम तुम्हाला थांबविण्यासाठी सांगितले असताना सुरू का केले अशी विचारणा केली. मात्र शिंदे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे हे काम पुन्हा करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर नियम व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ सोमनाथ शिंदे यांनी केली.