जैसलमेर बस दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू
बसमध्ये इमर्जन्सी एक्झिट नव्हती, दरवाजा जाम झाल्याने जीवितहानी
वृत्तसंस्था/ जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी एका खासगी बसला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. ही बस जोधपूरच्या दिशेने जात होती. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण होरपळून जखमी झाले आहेत. प्राथमिकत तपासात दुर्घटनेचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत असले तरीही बसमध्ये आग इतक्या वेगाने कशी फैलावली याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बसमध्ये आग लागल्यावर प्रवासी एकमात्र दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
बसला आग लागल्यावर प्रवासी एकमात्र दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याने दरवाजा जाम झाला. नंतर एक पोकलेन मशीन बोलावत दरवाजा तोडण्यात आला. तोपर्यंत अनेक लोकांनी जीव गमावला होता. बसमधील काही प्रवाशांनी खिडकी तोडून आणि उडी घेत स्वत:चा जीव वाचविण्यास यशस्वी ठरल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
आग लागण्यामागील कारण शॉर्टसर्किट मानले जात आहे. बसला काही वर्षांपूर्वी मॉडिफाय करविण्यात आले होते. बसमध्ये अनेक प्रकारचे ज्वलनशील पदार्थ होते. याचमुळे आग अत्यंत वेगाने फैलावली. एका मोठ्या स्फोटानंतर बस पूर्णपणे ज्वाळांनी वेढली गेल्याचे दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले.
डीएनए तपासणी
ही दुर्घटना मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली होती. बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते, ज्यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. दुर्घटनेत काही मृतदेह अत्यंत जळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासठी डीएनए चाचणी करविण्यात येणार आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि अन्य लोकांनी मदत कार्य त्वरित सुरू केले होते. यानंतर भारतीय सैन्याच्या 12 व्या रॅपिड डिव्हिजनची टीम देखील घटनास्थळी पोहोचली होती आणि पोकलेन मशीन आणि पाण्याच्या टँकर्सद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पीडित परिवारांना मदत करणार
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी घटनास्थळाचा दौरा करत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जैसलमेरमध्ये बस आग दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. राज्य सरकार जखमींवर उपचार आणि पीडित परिवारांना शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. बसमध्ये ज्वलनशील सामग्री होती आणि बाहेर पडण्याचा मार्ग अत्यंत अरुंद होता. शॉर्ट सर्किट आणि एसी गॅस लिकेजमुळे आग भडकल्याचे स्थानिक आमदार प्रताप पुरी यांनी सांगितले.