वाटेगावच्या ऊस वाहतूकदार शेतकऱ्यास 21 लाखांस गंडा
कामगार पुरवण्यासाठी रक्कम घेतली : कामगारही पुरवले नाहीत : कर्नाटक राज्यातील तिघांविरूद्ध गुन्हा नोंद
इस्लामपूर
उसतोड कामगार पुरवतो, असे सांगून वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील शेतकरी व ऊस वाहतूकदाराची सुमारे 21 लाखांची तिघांनी फसवणूक केली. लक्ष्मणआप्पा मनाप्पा राठोड, कृष्णाप्पा लोकाप्पा राठोड, अम्ब्रेश मोठाप्पा राठोड (तिघे रा. गोरबाल तांडा, जि. रायचूर कर्नाटक) या संशयितांवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटेगाव येथील महादेव विष्णू चव्हाण यांचे दोन ट्रॅक्टर असून ते ऑक्टोबर 2023 ते 2024 च्या गळीत हंगामासाठी उस वाहतुकीसाठी लावले आहेत. त्यासाठी उस तोडणी मुकादम लक्ष्मणआप्पा राठोड, कृष्णाप्पा राठोड, अम्ब्रेश राठोड यानी 18 उसतोड मजूर पुरवतो असे सांगितले. दि. 9 जून 2023 रोजी लक्ष्मणआप्पा राठोड याने रोख 10 लाख रूपये घेतले व त्याची इस्लामपूर येथे नोटरी केली. तसेच दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी कृष्णाप्पा राठोड, अम्ब्रेश राठोड यानी रोख 11 लाख रूपये घेतले व त्याची कर्नाटक येथे नोटरी करून घेतली.
त्यानंतर उसगळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी दिलेल्या कराराप्रमाणे 18 उसतोड मजूर आणण्यासाठी चव्हाण हे दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी लिंगसुगुर जि.रायचुर येथे गेले असता तेथे संशयित मुकादम भेटले नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ते कोठे मिळून आले नाहीत. यानंतर त्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद लागत होता. चव्हाण यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.