20 व्या जन्मदिनी संत होण्याची परंपरा
शतकांपासून होतेय पालन
एका देशात 20 व्या जन्मदिनी संत होण्याची परंपरा आहे. केवळ काही लोकच नव्हे तर सर्व लोकांकडून संत होण्याची आणि धार्मिक शिक्षण ग्रहण करण्याची अपेक्षा केली जाते. शतकांपासून ही परंपरा चालत आली आहे. जुन्या काळात राजासमवेत सर्व पुरुष स्वत:च्या 20 व्या जन्मदिनापूर्वी काही काळासाठी संत व्हायचे, परंतु सध्या काही युवाच या परंपरेचे पालन करतात.
थायलंड हा बौद्धबहुल देश आहे. थाई संस्कृतीत एखादा व्यक्ती 20 वर्षांचा झाल्यावर त्याला दीक्षा देण्याची परंपरा आहे. धर्माचे अध्ययन करण्यासाठी त्याने काही काळासाठी मठात प्रवेश करावा असे मानले जाते. या परंपरेला धार्मिक सेवेचे एक महान कार्य मानले जाते. शतकांपासून या परंपरेचे पालन जे कुटुंब करत आहे, त्याला अत्यंत सन्मानाने वागविण्यात येते. थाई पुरुषांसाठी ही स्वत:चे पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांबद्दल आभार व्यक्त करण्याची पद्धत आहे. या सोहळ्याला ‘बुआट नाक’ संस्कार म्हटले जाते.
बौद्ध पुरुष तीन महिन्यांपर्यंत भिक्षू म्हणून राहतात, यादरम्यान त्यांना खाओ फांसा म्हटले जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात हे सोहळे आयोजित व्हायचे. खाओ फांसा हे सर्वत्र फिरतात आणि लोकांना बौद्ध धर्माचे शिक्षण देत असतात. सध्याच्या काळात खाओ फांसा हे मठांमध्येच राहून धर्माचा अभ्यास करतात.
सध्याच्या काळात तीन महिन्यांपर्यंत संसारी जीवन सोडून कुणीच मठात राहू शकत नाही. याचमुळे परंपरा काही बदलली आहे. आता भिक्षूक 15 दिवस किंवा एक महिन्यापर्यंत दीक्षा घेऊ शकतात. आजही पावसाळ्याच्या प्रारंभीच नव्हे तर वर्षाच्या कुठल्याही काळात विधी केला जाऊ शकतो. बुआट नाकमधील बुआट शब्दाचा अर्थ नियुक्त करणे आहे. तर नाक या शब्दाचा नागा असा होतो. भारतासमवेत पूर्ण दक्षिणपूर्व आशियात नागांना दैवी, शक्तिशाली आणि अत्याधिक सन्मानित मानले जाते.