टाकाऊ समजलेल्या चित्राला 208 कोटीची किंमत
एका वृद्ध महिलेला स्वत:च्या घराच्या साफसफाईदरम्यान एक चित्र मिळाले. हे चित्र टाकाऊ असल्याचे या महिलेचे मानणे होते, परंतु काही काळानंतर तिला हे चित्र सामान्य नसून त्याला 25 दशलक्ष डॉलर्सहून (सुमारे 208 कोटी रुपये) अधिक किंमत मिळणार असल्याचे समजले. या चित्राचे नाव क्रिस्ट मॉक्ड आहे. इटलीचे चित्रकार सिम्बायू यांनी हे चित्र 13 व्या शतकात रेखाटले होते. फ्रान्सच्या सरकारने या चित्राला राष्ट्रीय वारसा घोषित केले आहे. हे चित्र आता फ्रान्सच्या प्रसिद्ध लोवुर संग्रहालयात प्रदर्शनार्थ ठेवले जाणार आहे. हे चित्र 2019 मध्ये साफसफाईदरम्यान मिळाले होते. लिलावात या चित्राला 25 दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत मिळाली आहे. तर साफसफाईचे काम करत असलेल्या महिलेचे वय 90 वर्षांपेक्षा अधिक आहे. जे चित्र स्वत:च्या घरात टांगलेले पाहतेय त्याची किंमत इतकी अधिक असल्याच्या जाणीवेपासून ती अनभिज्ञ होती. हे चित्र रशियाशी निगडित बेकार गोष्ट असल्याचे तिचे मानणे होते आणि ती हे चित्र कचऱ्याच्या पेटीत टाकण्याची तयारी करत होती.
या चित्राला चिलीचे अब्जाधीश अलवारो सैह बेंडेक आणि त्यांच्या अर्थतज्ञ पत्नी एना गुजमॅन अह्नफेल्ट यांनी स्वत:च्या वैयक्तिक संग्रहासाठी खरेदी केले होते. परंतु फ्रान्सच्या सरकारने या चित्राकरता निर्यात परवाना देण्यास नकार दिल्यावर समस्या उभी ठाकली होती. संग्रहालयाला चित्र स्वत:कडे बाळगण्यासाठी आवश्यक निधी जमा करण्यासाठी 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. चित्रासाठी संग्रहालयाने किती रक्कम देऊ केली याचा खुलासा करण्यात आलेला नाही. चित्रकार सिकाम्बू यांच्या आणखी एका चित्राचे नाव मेईस्टा असून ते संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. सध्या याच्या देखभालीचे काम होत आहे. मेइस्टा आणि क्रिस्ट मॉक्ड या दोन्ही चित्रांना 2025 मध्ये होणाऱ्या प्रदर्शनात सादर केले जाणार आहे.